एक्स (@Amrut_DogGuru)
राष्ट्रीय

याला म्हणतात इमानदारी! मालकाला वाचवण्यासाठी 'बेंथो' थेट वाघाशी भिडला, पुन्हा जंगलात पळवूनच जीव सोडला

डगमगत्या पायांवर, मानेवर डझनभर ठिकाणी खोल जखमा होऊनही जर्मन शेफर्ड जातीचा श्वान (नाव - बेंथो) जंगलातून आलेल्या भूकेल्या वाघाकडे रोखून बघत होता. वाघ गुरगुरला, डरकाळी फोडली आणि पुन्हा बेंथोवर झेपावला. न घाबरता, मालकाचा जीव वाचवण्यासाठी बेंथोनेही वाघावर झडप घेतली, काहीही झालं तरी मालकापर्यंत वाघाला पोहोचू देणार नाही...

Krantee V. Kale

डगमगत्या पायांवर, मानेवर डझनभर ठिकाणी खोल जखमा होऊनही जर्मन शेफर्ड जातीचा श्वान (नाव - बेंथो) जंगलातून आलेल्या भूकेल्या वाघाकडे रोखून बघत होता. वाघ गुरगुरला, डरकाळी फोडली आणि पुन्हा बेंथोवर झेपावला. न घाबरता, मालकाचा जीव वाचवण्यासाठी बेंथोनेही वाघावर झडप घेतली, काहीही झालं तरी मालकापर्यंत वाघाला पोहोचू देणार नाही असा जणू त्याने निश्चयच केला होता.

काही फूट अंतरावर, बेंथोचा मालक, शेतकरी शिवम बरगय्या भेदरलेल्या अवस्थेत स्तब्ध उभा होता. आपल्या श्वानाला स्वतःच्या वजनाच्या दहा पट असलेल्या वाघाशी भिडताना बघत होता. अखेर जर्मन शेफर्डच्या प्रतिकारासमोर वाघ हरला आणि आल्या पावली मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील जंगलात परत निघून गेला. लगेचच शिवम आपल्या तारणहाराकडे धावला, पण तो श्वान मात्र अजूनही लटपटणाऱ्या पायांवर उभा होता. वाघाच्या दिशेने रोखून पाहत होता. जो पर्यंत वाघ रात्रीच्या काळोखात दिसेनासा झाला नाही तोपर्यंत श्वान कसाबसा उभा होता, पण वाघ गायब होताच तो कोसळला. शेवटचा श्वास घेतला अन् मालकाचा कायमचा निरोप घेऊन तो जगातून गेला.

मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ, भोपाळपासून सुमारे ५०० किमी अंतरावर असलेल्या भरहुट गावात ही घटना २६ फेब्रुवारीच्या पहाटे घडली. या गावात २५० पेक्षा कमी कुटुंबे राहतात. साधारण १० वर्षांपूर्वी 'बेंथो' अगदी पिल्लू असताना शिवमने त्याला घरात आणले होते. तेव्हापासून शिवम जिथे जाईल तिथे सकाळ-संध्याकाळ बेंथो त्याच्या मागेच असायचा आणि रात्री शेतांमध्ये पीकांच्या संरक्षणासाठी गस्तही घालायचा. त्या दिवशीही पहाटे सुमारे चारच्या सुमारास शिवम आणि बेंथो शेताची राखण करत होते. "मी वाघाला दबा धरुन माझ्याकडे येताना पाहिले. अंगाचा थरकाप सुटला. पण बेंथोने क्षणभरही विचार न करता जोरजोरात भूंकत थेट वाघावर झेप घेतली", असे शिवमने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले.

वाघ क्षणभर दचकला, जणू तो द्विधा मनःस्थितीत होता. पण नंतर त्यानेही आपल्या पंज्यांनी जर्मन शेफर्डवर हल्ला चढवला. बेंथोला काहीच संधी नव्हती, पण तरीही तो मागे हटला नाही. वाघाने बेंथोची मान जबड्यात पकडून रक्तबंबाळ केली, पण तरीही तो झुंज देत होता. वाघ बेंथोला जबड्यात पकडून जंगलाकडे फरफटत नेऊ लागला, तरीही बेंथो अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष करत होता. अखेरीस वाघानेच हार मानली, थकून त्याने बेंथोला सोडून दिले आणि परत जंगलाच्या दिशेने धूम ठोकून निघून गेला.

शिवमने त्वरित बेंथोला आपल्या मिठीत उचलले आणि उमरिया शहरातील पशुवैद्याकडे २५ किमी दूर धाव घेतली. "सकाळी साधारण ५ वाजता तो माझ्या दारात आला, त्याच्या हातात एक गंभीर जखमी जर्मन शेफर्ड होता. 'त्याला वाचवा, त्याने माझे प्राण वाचवले,' तो मला विनवणी करु लागला," असे पशुवैद्य अखिलेश सिंग यांनी सांगितले. "त्याला एवढ्या गंभीर जखमा कशा झाल्या असे मी त्याला विचारले असता, बेंथोने वाघापासून मला वाचवले", असे शिवमने सांगितल्याचे सिंग म्हणाले. "मी माझ्या परीने शक्य तेवढे प्रयत्न केले, पण त्याच्या जखमा खूपच खोल आणि गंभीर होत्या. वाघाच्या दातांनी त्याच्या मानेत खोलवर घाव आणि पंज्यांनी त्याचे शरीर फाडले होते," असे सिंग म्हणाले. त्यानंतर काही तासांतच बेंथोने अखेरचा श्वास घेतला. आता बेंथोच्या इमानदारीची ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बेंथोच्या शौर्य आणि निष्ठेचे कौतुक करत नेटीझन्स त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई