माघी पौर्णिमा स्नानासाठी महाकुंभमेळा परिसर 'नो व्हेइकल झोन' म्हणून घोषित; सोमवारच्या प्रचंड वाहतूक कोंडीनंतर निर्णय; जाणून घ्या पर्यायी पार्किंग व्यवस्था एक्स - (@HiteshForChange आणि @iArijitRoy)
राष्ट्रीय

संपूर्ण महाकुंभमेळा परिसर 'नो व्हेइकल झोन'; सोमवारच्या अभूतपूर्व 'ट्रॅफिक जॅम'नंतर माघी पौर्णिमा स्नानानिमित्त खबरदारी

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात उद्या अर्थात बुधवारी (दि.१२) होणाऱ्या माघी पौर्णिमा स्नानासाठी संपूर्ण परिसराला 'नो व्हेइकल झोन' म्हणून घोषित केले आहे. आज मंगळवारी (दि.११) पहाटे ४ वाजल्यापासून १२ फेब्रुवारीला स्नानानंतर भाविक पुन्हा व्यवस्थित परत जाईपर्यंत संपूर्ण महाकुंभमेळा परिसरात कोणतेही वाहन नेता येणार नाही.

Kkhushi Niramish

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात उद्या अर्थात बुधवारी (दि.१२) होणाऱ्या माघी पौर्णिमा स्नानासाठी संपूर्ण परिसराला 'नो व्हेइकल झोन' म्हणून घोषित केले आहे. आज मंगळवारी (दि.११) पहाटे ४ वाजल्यापासून १२ फेब्रुवारीला स्नानानंतर भाविक पुन्हा व्यवस्थित परत जाईपर्यंत संपूर्ण महाकुंभमेळा परिसरात कोणतेही वाहन नेता येणार नाही. अत्यावश्यक सेवा आणि आपत्कालीन सेवा वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. सोमवारच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कोट्यवधी भाविक महाकुंभमेळ्यात येत आहेत. मात्र, सोमवारी याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडींचा सामना करावा लागला. महाकुंभमेळ्याला आलेले भाविक ३०० ते ३५० किलोमीटरपर्यंत मोठ्या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यामुळे वाहनांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत होत्या. प्रयागराज संगम रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमल्याने स्टेशन बंद करावे लागले. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना तासन‌्तास अन्न-पाण्यावाचून राहावे लागले. या वाहतूककोंडीचा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कामकाजावरही परिणाम झाला. वकील कोर्टात पोहोचू न शकल्याने अनेक सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या. भाविकांना ३० तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावरून याचे गांभीर्य लक्षात येते. या वाहतूक कोंडीचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

या वाहतूक कोंडीविषयी उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, 'वाहतूक कोंडी गैरव्यवस्थापनेमुळे झाली नव्हती तर मेळ्यात आलेल्या भाविकांच्या संख्येमुळे निर्माण झाली होती'. महाकुंभमेळा हा १३ जानेवारीला सुरु झाला असून आतापर्यंत ४० कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे. अजूनही दररोज लाखो भाविक येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

महाकुंभ स्नानासाठी बाहेरून प्रयागराज शहरात येणाऱ्या भाविकांची वाहने ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजल्यानंतर संबंधित मार्गांच्या पार्किंगमध्ये पार्क केली जातील. रिपोर्ट्सनुसार, बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी ३६ वाहनतळ बनवण्यात आले आहेत. तिथे वाहन पार्क करून भाविकांना स्नानासाठी संगमापर्यंत पायी जावे लागणार आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत