नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये बुधवारी (दि.३) सकाळी भीषण आग लागून किमान २० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने तसेच आगीची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य
माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) विभागाला सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अनेक अग्निशमन बंब रवाना करण्यात आले. बचाव मोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या ११ जणांची सुटका करण्यात आली. सर्व जखमींना दिल्लीच्या आपत्कालीन CATS रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
DDMA नियंत्रण कक्ष तातडीने सक्रिय
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिस, जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करणारी यंत्रणा DDMA, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर घटनास्थळी दाखल झाल्या. उपविभागीय दंडाधिकारी (SDM) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी DDMA नियंत्रण कक्ष तातडीने सक्रिय करण्यात आला होता.
तळमजल्यावरील रेस्टॉरंटमधून आग लागल्याचा संशय
"घटनास्थळी पोहोचल्यानंतर तळमजल्यावर रेस्टॉरंट सुरू असल्याचे समोर आले. प्राथमिक अंदाजानुसार आग तेथूनच लागली असावी. मात्र, नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल," असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच या आगीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक जखमींवर उपचार सुरू
बचाव मोहिमेदरम्यान घटनास्थळावरून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच सात ते आठ जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दुर्घटनेचा तपास सुरू
नेहरू प्लेस अग्निशमन केंद्राचे विभागीय अधिकारी रवींद्र यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य राबवण्यात आले. सध्या आग पूर्णपणे आटोक्यात आली असून आता दुर्घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवीय नगर येथील आग दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असून जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.