राष्ट्रीय

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात ड्रेसकोड बंधनकारक

Swapnil S

पुरी : येथील जगविख्यात जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट ठेवणीतले कपडे घालणे मंदिर व्यवस्थापनाने बंधनकारक केले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिराने ठरवून दिलेला ड्रेसकोड परिधान करणे १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मंदिराच्या आवारात गुटखा आणि पान खाण्यावर तसेच प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

श्री जगन्नाथ टेम्पल अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना सभ्यतेला साजेसे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जे भाविक अर्धी चड्डी, फाटकी जीन्स, स्कर्ट आणि बिनबाह्यांचे ड्रेस घालून मंदिरात येतील त्यांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाचा हा ड्रेसकोड लागू होताच १ जानेवारीपासून भाविक धोतर नेसून मंदिरात प्रवेश करताना दिसू लागले आहेत. तसेच महिला साडी व सलवार कमीज घालून दर्शन घेताना दिसून येत आहेत. मंदिर प्रशासनाने याआधी देखील ड्रेसकोड लागू केला होता आणि पोलिसांना त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. तसेच मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी मंदिराच्या परिसरात गुटखा आणि पानावर बंदी घालण्यात आली आहे.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्री जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे १.४० वाजता ताटकळणाऱ्या भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे १.८० लाख भाविकांनी श्री जगन्नाथाचे दर्शन घेतले. भाविकांना दर्शन सहजपणे मिळावे यासाठी पोलीस काळजी घेत होते. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील सर्वत्र लावण्यात आले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस