बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या आगामी दौऱ्याचे चीनने स्वागत केले आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा चीन दौरा होत आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे एससीओ तियानजिन शिखर परिषदेतील सहभागासाठी चीन स्वागत करतो. आमच्या सर्व भागीदारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एकजूट व मित्रता यांच्यामुळे ‘एससीओ’ नवीन उंचीवर पोहचेल व त्यातून अधिक समन्वय, ऊर्जा, उत्पादकता जगाला पाहायला मिळेल. हे मित्रत्वाचे संमेलन असेल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी हे चीनच्या दौऱ्यापूर्वी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत द्विपक्षीय संमेलनात सहभागी होऊ शकतात.
पंतप्रधान मोदी हे यापूर्वी २०१८ मध्ये पहिल्यांदा चीनला गेले होते. तेथे त्यांनी वुहान येथे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत अनौपचारिक शिखर संमेलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर मोदी हे किंगदाओ येथील ‘एससीओ’ शिखर परिषदेत भाग घ्यायला गेले होते. २०१९ मध्ये शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर आले होते.