राष्ट्रीय

मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘तो’ विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याबाबत नेहरूंनंतर दुसऱ्या स्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या बाबतीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या बाबतीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. शुक्रवारपासून मोदींचा कार्यकाळ ४,०७८ दिवसांचा झाला असून ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत.

इंदिरा गांधींचा कार्यकाळ २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ असा ४,०७७ दिवसांचा होता. मोदींनी हा विक्रम मोडला आहे. मोदी यांनी गेली २४ वर्षे अखंड सत्तेत घालवली आहेत. ते २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सलग १३ वर्षे त्यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सलग तीन कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकार चालवले आहे. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत.

मोदींच्या नावावर अनेक विक्रम

मोदी हे देशातील सर्वाधिक कार्यकाळ असलेले पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान असून याआधी हा विक्रम अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर होता. हिंदी नसलेल्या राज्यातून इतका मोठा कार्यकाळ गाजवणारे पहिले पंतप्रधान, मुख्यमंत्रीपद आणि पंतप्रधानपद मिळून सर्वाधिक काळ निवडून आलेल्या सरकारचे नेतृत्व करणारे पहिले नेते, सलग दोन कार्यकाळ पूर्ण करणारे आणि स्वतःच्या पक्षाला बहुमत मिळवून देणारे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान, इंदिरा गांधींनंतर पुन्हा बहुमताने सत्ता मिळवणारे आणि पंडित नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा केंद्र सरकार स्थापन करणारे दुसरे नेते, सलग सहा निवडणुका जिंकण्याचा विक्रम : २००२, २००७, २०१२ मधील गुजरात विधानसभा निवडणुका आणि २०१४, २०१९, २०२४ मधील लोकसभा निवडणुका, असे विक्रम मोदी यांच्या नावावर आहेत.

पंडित नेहरूंचा विक्रम मोडणार?

मोदी हे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही विक्रम मोडीत काढतील, असे सध्यातरी चित्र आहे. ११ जुलै २०२६ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना या यादीत मागे टाकतील. कारण, नेहरूंच्या नावावर ४ हजार ४२५ दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे, तर सध्या मोदी ४ हजार ०७८ दिवस पंतप्रधान पदावर राहिले आहेत.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास