राष्ट्रीय

ट्रम्प-मोदी यांच्यात फोनवरून ४० मिनिटे संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात मंगळवारी ४० मिनिटे फोनवरून चर्चा झाल्याने घडामोडींना वेग आला आहे. मोदी व ट्रम्प यांच्यातील संभाषणाची माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : युद्धाबाबतची कोंडी कायम असतानाच आता अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी व्हावी असे प्रयत्न पाकिस्तानने चालू केले आहेत. येत्या आठवडाभरात इस्लामाबादमध्येच ही दुसरी बैठक होईल असे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात मंगळवारी ४० मिनिटे फोनवरून चर्चा झाल्याने घडामोडींना वेग आला आहे. मोदी व ट्रम्प यांच्यातील संभाषणाची माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यासह अनेक 'मोठ्या करारां'वर चर्चा केली, अशी माहिती भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. मोदी व ट्रम्प यांच्यातील या वर्षातील दोन्ही नेत्यांमधील हा तिसरा फोन कॉल आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियात सुरू झालेल्या संघर्षानंतरचा हा दुसरा संवाद आहे.

येत्या काही दिवसांत आणि आठवड्यांत भारत आणि अमेरिका यांच्यात ऊर्जेसह इतर काही महत्त्वाच्या क्षेत्रांत मोठे करार होण्याची अपेक्षा असल्याचे राजदूतांनी सांगितले.

गोर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यात झालेल्या ४० मिनिटांच्या फोन संभाषणादरम्यान पश्चिम आशियातील हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. इराण आणि अमेरिका यांच्यातील अलीकडच्या शांतता चर्चेनंतरचे हे पहिलेच संभाषण होते. या संभाषणाचा शेवट करताना ट्रम्प यांनी पंतप्रधानांना सांगितले की, "मला फक्त तुम्हाला हे सांगायचे आहे की, आमचे सर्वांचे तुमच्यावर प्रेम आहे," असे अमेरिकन राजदूतांनी नमूद केले.

अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी लवकरच?

गेल्या आठवड्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर इराण युद्धाबाबत कोंडी निर्माण झाली आहे. २२ एप्रिलपर्यंत लागू असलेला तात्पुरता शस्त्रसंधीचा करार सध्या टिकून असला, तरी दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान, पाकिस्तानने अमेरिका आणि इराणला दुसऱ्या फेरीच्या चर्चेचा प्रस्ताव दिला असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

इराणसोबतच्या वाटाघाटींमध्ये काही प्रमाणात प्रगती झाली आहे, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स यांनी यापूर्वी म्हटले होते .तर, आम्हाला दुसऱ्या बाजूने (इराणकडून) बोलावणे आले आहे आणि त्यांना करार करायचा आहे, असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केला होता.

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी