उत्तर प्रदेशच्या बरेली येथील मौलाना, ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ‘गुन्हेगार’ ठरवले आहे. "शमीने जाणूनबुजून 'रोजा' ठेवला नाही, हे कृत्य शरियतच्या विरोधात आहे, हा गुन्हा आहे", असे ते म्हणाले.
रमजानमध्ये बहुतांश मुस्लिम बांधव महिनाभर रोजाचे उपवास करतात. मात्र, मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुबईच्या कडक उन्हात झालेल्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शमी मैदानात ज्यूस किंवा एनर्जी ड्रिंक घेताना दिसला होता, त्यावरुन रजवी यांनी शमीला धारेवर धरले.
शरियतच्या दृष्टीने तो अपराधी -
"इस्लाममध्ये प्रत्येकाने रोजाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. जर कोणी व्यक्ती जाणूनबुजून रोजा ठेवत नसेल, तर तो मोठा गुन्हेगार ठरतो. मोहम्मद शमीने रोजा न ठेवून मोठा गुन्हा केला आहे. शरियतच्या दृष्टीने तो अपराधी आहे," असे रजवी यांनी निवेदन जारी करत म्हटले.
माध्यमांशी संवाद साधताना, "इस्लाममध्ये प्रत्येकाने रोजाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. जर कोणी निरोगी पुरुष किंवा महिला रोजा ठेवत नसेल, तर तो मोठा अपराधी ठरतो. मोहम्मद शमीने सामना सुरू असताना पाणी किंवा इतर पेय पदार्थ घेतले, त्यांना अनेकांनी पाहिले. तो खेळत होता, याचा अर्थ तो पूर्णतः निरोगी होता. तरीही त्याने रोजा ठेवला नाही आणि पाणीही प्यायला. त्यामुळे चुकीचा संदेश जातो. शमीने गुन्हा केला आहे. शरियतच्या दृष्टीने तो अपराधी आहे आणि त्याला अल्लाहपुढे माफी मागावी लागेल, उत्तर द्यावे लागेल" असे रजवी म्हणाले. क्रिकेट खेळा, सर्व कामे करा, परंतु अल्लाहने दिलेल्या जबाबदाऱ्याही पार पाडा. शमीने हे सर्व समजून घेतले पाहिजे. शमीने आपल्या पापांची अल्लाहकडे माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.
सोशल मीडियावर शमीचा फोटो आणि मौलाना रजवी यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटिझन्स व्यक्त होत आहेत. शमीची बाजू घेत मौलाना रजवी यांच्यावर अनेकजण टीका करीत आहेत.