अलिगड : समरसतेमुळे समाजात परिवर्तन होऊ शकते. त्यामुळे हिंदूंसाठी एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी असावी, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात सर्व प्रकारचे भेदभाव विसरून हिंदू समाजाला एकत्र करायचे आहे. शाखांची संख्या वाढली पाहिजे. त्यामुळे माणूस घडवण्याची प्रक्रिया वाढू शकेल. सामाजिक परिवर्तनात स्वयंसेवकांची भूमिका महत्वाची आहे. स्वयंसेवक हे राष्ट्रभक्तीने भारलेले असतात. समाजात समरसतेचा भाव आणावा. संघाच्या स्वयंसेवकाने समाजाच्या प्रत्येक जातीच्या घरात जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. त्यांचा आदरसत्कार करून त्यांना आपल्या घरी आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला कुटुंब व संस्काराचे जतन करायचे आहे. कुटुंबात एकजुटीने पूजा व हवन झाले पाहिजे. एकत्रित बसून जेवण करावे, त्यामुळे कुटुंब अधिक मजबूत बनेल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जगात शांती व सुख आणण्यासाठी भारत हाच एकमेव देश काम करेल. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी आपले काम करावे, असे त्यांनी सांगितले.