मुंबई : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात मुंबईतील घाटकोपरमधील अवघ्या २३ वर्षीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण घाटकोपर परिसरासह मुंबईत शोककळा पसरली आहे. हि दुःखद बातमी समाजताच त्यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.
२०२२ मध्ये मुरली नाईक यांनी भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा सुरू केली. त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण देवळाली कॅम्प (नाशिक) येथे झाले. पहिली तैनाती आसाममध्ये होती, त्यानंतर ते पंजाबमध्ये कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली जम्मू-काश्मीरमधील उरी येथे करण्यात आली होती. मात्र ९ मे रोजी पहाटे LOC जवळील संघर्षात त्यांनी वीरमरण पत्करले.
मुरली नाईक हे मूळचे आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील पेनुकोंडा विधानसभा मतदारसंघातील गोरंटला मंडल येथील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून मुंबईतील घाटकोपरमधील कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. मात्र अलीकडेच या परिसरात सुरू झालेल्या पुनर्विकास प्रकल्पामुळे त्यांचे घर तोडण्यात आले.
अंत्यसंस्कार मूळ गावी
त्यांचे आई-वडील २ मे रोजी कल्की तांडा या ठिकाणी यात्रा असल्याने आंध्रप्रदेश येथे आपल्या गावी आले. यामुळे अंत्यविधिकारिता त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी उद्या १० मे रोजी सायंकाळी नेण्यात येणार आहे.
एन. चंद्राबाबू नायडू यांनी वाहिली श्रद्धांजली
त्यांच्या निधनानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी श्रद्धांजली वाहिली. “श्री सत्य साई जिल्ह्यातील एका सुपुत्राने देशासाठी बलिदान दिले आहे. शहीद मुरली नाईक यांना आदरांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना,” असे ते म्हणाले.