गुवाहाटी : भारत आणि म्यानमार यांच्यात सुरू असलेली मुक्त प्रवेश योजना (फ्री मुव्हमेंट रिजिम - एफएमआर) बंद करून म्यानमार सीमेवर भारत कुंपण घालणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केली. आसाम पोलिसांच्या कमांडो पथकाचा दीक्षांत समारंभ शनिवारी गुवाहाटी येथे पार पडला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून म्यानमारच्या लष्कराविरुद्ध तेथील बंडखोर गटांनी सशस्त्र उठाव केला आहे. आराकान आर्मी (एए) या गटाने म्यानमारच्या सैन्याचे सीमावर्ती भागातील अनेक तळ काबीज केले आहेत. त्यामुळे म्यानमारच्या रखाईन प्रांतातून ६०० सैनिक भारतात पळून आले आहेत. त्यांनी मिझोरामच्या लाँगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांत भारत-म्यानमार सीमेवरून मानवी तस्करी आणि अवैध वाहतूक वाढली होती. त्यामुळे मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सीमेवर कुंपण घालण्याची मागणी केली होती. नागालँड आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र त्याला विरोध केला होता. या घटनांनंतर केंद्र सरकारने भारत-म्यानमारमधील मुक्त प्रवेश योजना बंद करून बांगलादेश सीमेप्रमाणे म्यानमारच्या पूर्ण सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यापूर्वीच निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरच ही सीमा बंद होणार आहे.
'एफएमआर' म्हणजे काय?
भारत आणि म्यानमार यांच्यात १६४३ किलोमीटर लांबीची सामायिक सरहद्द आहे. भारताच्या मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना म्यानमारची सीमा लागून आहे. सध्या त्यापैकी मणिपूरमधील केवळ १० किमी सीमेवर कुंपण घातलेले आहे. बाकीची सीमा खुली आहे. दोन्ही देशांतील आदिवासींची कुटुंबे सीमेच्या दोन्ही बाजूंना विभागली गेली आहेत. त्यांना व्हिसाशिवाय सीमा पार करून १६ किमीपर्यंतच्या भागात दोन आठवडे राहण्याची मुभा आहे. ही योजना सुरुवातीला १९७०च्या दशकात विचारार्थ आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१८ साली मुक्त प्रवेश योजनेला (फ्री मुव्हमेंट रिजिम - एफएमआर) अंतिम स्वरूप दिले होते. आता ही सोय बंद होणार असून म्यानमारच्या नागरिकांना भारतात प्रवेशासाठी व्हिसा वापरावा लागणार आहे.