महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या स्फोटक निर्मिती कारखान्यात रविवारी (दि.१) भीषण स्फोट होऊन किमान १७ जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा स्फोट एसबीएल एनर्जी लिमिटेड (SBL Energy Limited) या खाण आणि औद्योगिक स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात झाला. स्फोट इतका तीव्र होता की, कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कामगार त्यात सापडले. जखमींना तातडीने नागपूरमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; आर्थिक मदतीची घोषणा
या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान कार्यालयाने (PMO) तीव्र दुःख व्यक्त केले. पंतप्रधानांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, "महाराष्ट्रातील नागपूर येथील कारखान्यात झालेला स्फोट अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन प्रभावित नागरिकांना मदत करत आहे."
तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस घटनास्थळी प्रशासनाच्या संपर्कात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत ही घटना "अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक" असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, "मी स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत."
तसेच पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) आणि कामगार सुरक्षा विभागाच्या (DISH) पथकांनीही घटनास्थळी भेट दिली असून बचावकार्य अधिक वेगाने सुरू आहे.
चौकशीचे आदेश; बचावकार्य सुरूच
या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूरमधील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, आपत्कालीन पथके घटनास्थळी ढिगारा हटविण्याचे आणि संभाव्य अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे काम करत आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.