फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक

हैदराबादमध्ये NEET-UG २०२६ पुनर्परीक्षेदरम्यान कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षा केंद्रातील स्वच्छतागृहाच्या फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून त्याद्वारे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करताना तो रंगेहात पकडला गेला.

Mayuri Gawade

हैदराबादमध्ये NEET-UG २०२६ पुनर्परीक्षेदरम्यान कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षा केंद्रातील स्वच्छतागृहाच्या फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून त्याद्वारे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करताना तो रंगेहात पकडला गेला.

ही घटना आदिबतला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रगन्नागुडा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत (ZPHS) रविवारी घडली. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था आणि अनेक स्तरांवरील तपासणी असतानाही विद्यार्थ्याने ही युक्ती आखल्याचे तपासात समोर आले आहे.

परीक्षेपूर्वीच आखला कट

हैदराबाद शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचमपेट येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याने आधीच कॉपीचा कट रचला होता. सकाळी सुमारे ७ वाजता तो परीक्षा केंद्र परिसरात पोहोचला आणि शाळेच्या भिंतीलगत असलेल्या व्हेंटिलेटरमधून त्याने मोबाईल आत लपवून ठेवला. त्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्याने तो मोबाईल पुन्हा घेतला. मोबाईल झिप-लॉक कव्हरमध्ये ठेवून स्वच्छतागृहातील फ्लश टँकमध्ये लपवण्यात आल्याचा आरोप आहे.

पोटदुखीचे कारण सांगून गेला स्वच्छतागृहात

परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्याने पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगत स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी मागितली. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने पर्यवेक्षकांना संशय आला. यानंतर कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी संबंधित विद्यार्थी स्वच्छतागृहात मोबाईलच्या मदतीने उत्तरं शोधत असल्याचे आढळून आले. याची माहिती तत्काळ केंद्रावर तैनात पोलिसांना देण्यात आली आणि मोबाईल जप्त करण्यात आला.

गुगलवर शोधत होता उत्तरं

प्राथमिक तपासात विद्यार्थी मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करून प्रश्नांची उत्तरं शोधत असल्याचे समोर आले आहे. मोबाईलमध्ये कोणतेही विशेष कॉपी ॲप आढळले नसून इन्स्टाग्रामसह काही नियमित वापरातील ॲप्स असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हा दाखल

चौकशीदरम्यान विद्यार्थ्याने कॉपीचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शाळा प्रशासनाच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) तसेच सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर

नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी

Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर

रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई

ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन