राष्ट्रीय

मी कार्यकर्ता, नितीन नबीन हे माझे बॉस! मोदींनी सांगितली भाजपची संस्कृती; नव्या भाजप अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा

जेव्हा पक्षीय बाब असेल तेव्हा नितीन नबीन हे माझे बॉस आहेत आणि मी कार्यकर्ता आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. दिल्लीत भाजप मुख्यालयात पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी मोदी बोलत होते.

Swapnil S

नवी दिल्ली : जेव्हा पक्षीय बाब असेल तेव्हा नितीन नबीन हे माझे बॉस आहेत आणि मी कार्यकर्ता आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. दिल्लीत भाजप मुख्यालयात पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी मोदी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. आज भाजपचे लक्ष संघटनेच्या विस्तारावर आहे, तसे कार्यकर्ते घडवण्याकडेही प्राधान्य आहे. भाजप हा एक असा पक्ष आहे, जेथे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. तिसऱ्यांदा ते पंतप्रधान बनलेत. वयाच्या ५० व्या वर्षी मुख्यमंत्री बनलेत. २५ वर्ष सातत्याने प्रशासनात मुख्य आहेत परंतु हे सर्व ज्या-त्या जागी आहे. यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

शून्यापासून शिखरापर्यंत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात भाजपने शून्यापासून शिखरापर्यंत प्रवास पाहिला आहे. यात व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी संघटनेचा विस्तार केला. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात भाजपने पहिल्यांदा स्वबळावर बहुमत मिळवले.

त्यानंतर अमित शहांच्या नेतृत्वात देशातील अनेक राज्यात भाजप सरकार बनले. सलग दुसऱ्यांदा भाजपचे केंद्रात सरकार आले. जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात भाजप पंचायतीपासून संसदेपर्यंत आणखी सशक्त झाली. केंद्रात तिसऱ्यांदा भाजप-एनडीएचे सरकार बनले. मी पूर्वीच्या सर्व अध्यक्षांचे आणि त्यांच्या योगदानासाठी कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.

नितीन नबीन हे आमच्या सगळ्यांचे अध्यक्ष आहेत. त्यांची जबाबदारी फक्त पक्ष सांभाळणे इतकेच नाही तर एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यात समन्वय ठेवणे हेही आहे. भाजप युवा मोर्चाची जबाबदारी असेल, विविध राज्यात प्रभारी म्हणून जबाबदारी असेल, बिहार सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळणे असेल, नितीन नबीन यांना जी-जी जबाबदारी मिळाली ती पूर्णपणे त्यांनी सांभाळली. २१ व्या शतकातील येणारी २५ वर्षे खूप महत्त्वाची आहे. हा तो काळ आहे ज्यात विकसित भारत निर्माण होणार आहे. या महत्त्वपूर्ण कालखंडात नितीन नबीन भाजपचा वारसा पुढे नेणार आहेत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

सामान्य कार्यकर्ता सर्वोच्च पदावर!

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्ष मुख्यालयात नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नबीन म्हणाले, आज माझ्यासाठी संकल्पाचा क्षण आहे. आज मी फक्त पद स्वीकारत नाही. मी या पक्षाच्या विचारसरणी, परंपरा आणि राष्ट्रवादी चळवळीची जबाबदारी स्वीकारत आहे. आज १.४ अब्ज भारतीय विकसित भारताच्या स्वप्नाशी स्वतःला जोडत आहेत आणि देशाला पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि मोदींच्या पाठिंब्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी मिळाली, यासाठी मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो, असेही ते म्हणाले.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग