पाटणा : बिहार निवडणूक निकालानंतर समसमान सत्तावाटपाचे सूत्र भाजपने प्रस्तावित केले होते. गुरुवारी झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून जदयूचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत अन्य २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे १४ व जदयूच्या ८ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात समसमान सत्तावाटपाचे सूत्र प्रत्यक्षात उतरले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.
भाजपला दोन उपमुख्यमंत्रीपदे देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे लोकजनशक्ती पार्टीला दोन, हिंदुस्थानी अवाम मोर्चाला एक आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला एक अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपचे सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
भाजप, जदयू, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास पासवान), हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत रालोआतील भाजपला ८९, जद(यू) ला ८५, लोजपला (रामविलास) १९, हिंदुस्थानी अवाम मोर्चाला ५, राष्ट्रीय लोक मोर्चाला ४ जागांवर विजय मिळाला, तर महाआघाडीत राजदला २५, काँग्रेसला ६, सीपीआय (एमएल) २, आयआयपीला १, भाकपला एक, एआयएमआयएमला ५ आणि बसपला एका जागेवर विजय मिळाला.