नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आता दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालला असून इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. तृणमूल काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षांना हा ठराव शक्य तितक्या लवकर मांडावयाचा होता आणि त्यासाठी खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेणे सुरू होते. अखेर हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा संदर्भ देण्यापासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रोखण्यात आल्याने अध्यक्ष आणि विरोधी पक्षांमधील तणाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविनाच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठराव लोकसभेत मंजूर करण्यात आल्याने विरोधक नाराज होते.
काँग्रेसचे काही खासदार विशेषत: महिला खासदार मोदी यांच्या आसनापर्यंत जाऊन हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे बिर्ला यांनी सभागृहात सांगितले आणि त्यामुळे सभागृहात येऊ नये असे आपणच मोदींना सांगितले, असे बिर्ला म्हणाले. बिर्ला यांचे हे विधान आणि अन्य घडामोडी या अविश्वास ठरावाचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी न देणे, मोदी यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून आपणच त्यांना सभागृहात येऊ नका असे सांगितले, हे बिर्ला यांचे वक्तव्य, महिला खासदार पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याचा बिर्ला यांच्याकडून करण्यात आलेला उल्लेख ही अविश्वास ठराव मांडण्यामागची प्रमुख कारणे असून आम्हाला अध्यक्षांकडून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे विरोधी पक्षाच्या एका खासदाराने सांगितले.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याची एक ठरावीक भूमिका असते, ते शॅडो पंतप्रधान असतात, मात्र विरोधी पक्षनेते बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा त्यांचा माइकच बंद केला जातो, विरोधी सदस्याला बोलूच दिले जात नाही, ही संसद आता एकतर्फी झाली आहे. अध्यक्षांनी काँग्रेसच्या महिला खासदारांवरही गंभीर आरोप केले आहेत, महिला सदस्यांना घाबरून मोदी संसदेत आले नाहीत, असे बिर्ला म्हणाले. अध्यक्षांनी कोणाचीही बाजू घेणे अपेक्षित नसते, पण सध्या तेच घडत आहे, असे काँग्रेसचे नेते वेणुगोपाळ म्हणाले.
११८ खासदारांची सही
काँग्रेस, सपा, द्रमुक आणि अन्य विरोधी पक्षांच्या ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेली ही सूचना संविधानाच्या कलम ९४ (क) अंतर्गत लोकसभा सचिवालयास सादर करण्यात आली आहे.
राहुल यांची सही नाही
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, लोकशाहीची गरिमा पाहता विरोधी पक्षनेत्याने लोकसभा अध्यक्षांविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीवर सही करणे योग्य ठरले नसते, त्यामुळे राहुल यांची सही नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
बिर्ला सभागृहाच्या कामकाजापासून दूर
विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस लोकसभा सरचिटणीसांकडे सोपविण्यात आल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वत:ला सभागृहाच्या कामकाजापासून दूर ठेवले आहे. मंगळवारी सकाळपासून ते सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी सभागृहात आलेले नाहीत.