प्रकाश सावंत
दुसरी बाजू
पंतप्रधान नरेंद्र मोदी फर्डे वक्तेच नाहीत, तर स्वत:चा करिश्मा असलेले वलयांकित नेते आहेत. त्यांच्याच जोरावरच भाजपने आजवर सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने राहुल गांधी यांना रणमैदानात उतरवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेसने ‘अँग्री यंग वुमन’ व ‘फायरब्रॅण्ड’ नेत्या प्रियांका गांधी यांच्या रूपाने आपले नवे अस्त्र परजले आहे. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात आता प्रियांका गांधी नावाचे नवे वादळ घोंगावणार असून ते देशाच्या राजकारणाला कसे वळण देते याचे उत्तर आगामी काळच देईल.
पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, मनेका गांधी, वरुण गांधी यांच्यानंतर आता भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर राहुल गांधी व प्रियांका गांधी यांचा उदय झाला आहे. या गांधी परिवाराला केवळ नेतृत्वाचीच नव्हे, तर त्यागाची संस्कृती-परंपरा आहे. या परिवाराने देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याचे प्रयत्न केले नाहीत असे नाही. एवढेच नव्हे, तर काँग्रेसच्या कार्यकाळात साखर सम्राट, दूध सम्राट, शिक्षण सम्राट तयार झाले नाहीत असेही नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात काही नेते जनतेला गृहित धरून चालू लागले. त्यामुळेच देशातील जनतेने काँग्रेस नेत्यांचा माज उतरवून सत्तेची सूत्रे भाजपच्या हाती सोपवली. ज्या भाजपने साधनशूचितेचा, पारदर्शी कारभाराचा व आम्ही इतरांपेक्षा वेगळे असल्याचा आव आणला, त्यांचेही ‘पाय मातीचेच’ असल्याचे मागील दहा वर्षांच्या सत्ताकाळात स्पष्ट झाले आहे. संघ व भाजपची रणनीती ही ब्रिटिशांप्रमाणे ‘झोडा व फोडा’ अशीच राहिली. त्यांनी जाती-धर्मामध्ये भांडणे लावली. आमदार-खासदार फोडले. सरकारे उलथवून टाकली. हे कमी म्हणून की काय, ‘हम करे सो’ कायदा सुरू केला. परिणामी देशातील सुज्ञ मतदारांनी भाजप नेत्यांच्या अहंकाराचा फुगा फोडला. लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. देशात ‘मिलीजुली’च्या सरकारशिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यामुळेच आता लोकसभेत सत्ताधारी भाजपला आव्हान देणारे तुल्यबळ विरोधक असतील ही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणता येईल.
एकेकाळी भाजपमध्ये सुषमा स्वराज यांचे आगळे स्थान होते. फायर ब्रँड नेत्या उमा भारती होत्या. मागील कार्यकाळ स्मृती इराणी यांनी गाजवला. आताच्या भाजपच्या खासदारांमध्ये बांसुरी स्वराज (नवी दिल्ली), शोभा करांदलाजे (बंगळुरू उत्तर), दग्गुबती पुरंदेश्वरी (राजाहमुंद्री, आंध्र प्रदेश), संगीता सिंग देव (बोलंगीर, ओदिशा) अशी आक्रमक नेत्यांची फळी आहे. त्यांच्या दिमतीला अभिनेत्री कंगना राणावत (मंडी, हिमाचल प्रदेश), ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी (मथुरा, उत्तर प्रदेश), अपराजीता सरंगी (भुवनेश्वर, ओदिशा), डी. के. अरुणा (मेहबूबनगर, तेलंगणा), जदयुच्या लवली आनंद (शेओहर, बिहार), अपना दलाच्या अनुप्रिया पटेल (मिर्झापूर, उत्तर प्रदेश) अशा नेत्यांची फौज आहे. तसेच, दुसरीकडे काँग्रेसच्या कुमारी सैलजा (सिरसा, हरयाणा), वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई), प्रणिती शिंदे (सोलापूर), शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (बारामती), सपाच्या डिंपल यादव (मैनपुरी, उत्तर प्रदेश), इक्रा चौधरी (कैराना, उत्तर प्रदेश), तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा (कृष्णा नगर, पश्चिम बंगाल), राजदच्या मिसा भारती (पाटलीपुत्र, बिहार) अशी तगडी टीम आहे. सध्या तरी विरोधकांची आघाडी अधिक सरस कामगिरी करण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यात आता केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रियांका गांधी यांची लवकरच भर पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ युवा नेत्या प्रियांका गांधी राजकारणात उतरल्या. रायबरेलीमध्ये त्यांनी जवळपास वीस वर्षे पक्षाचे संघटनात्मक काम पाहिले. २०१९ मध्ये त्यांनी पूर्व उत्तर प्रदेश राज्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी पेलली. डिसेंबर २३ मध्ये त्यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रियांका गाधी यांच्या नेतृत्वाची गुणवैशिष्ट्ये म्हणजे त्या पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी व सोनिया गांधी यांचा समर्थ वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. आपण कोणीतरी विशेष आहोत असा अविर्भाव त्यांनी कधीही दाखविला नाही. मुख्य म्हणजे काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर म्हणून त्यांनी अत्यंत मर्मग्राही व मर्मभेदी भाषणे केली. जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून त्या केवळ सरकारवर तुटूनच पडल्या नाहीत, तर त्या देशातील तरुण, महिला, कष्टकरी, शेतकरी यांचा ‘आवाज’ बनल्या. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ललकारलेच नाही, तर आपले मुद्देसुद विचार मांडून त्यांच्या टोलेजंग दाव्यातील हवाच काढून घेतली. त्यांची छबी इंदिरा गांधी यांच्याशी साधर्म्य साधणारी. म्हणूनच त्या आल्या की जनतेमधून उत्स्फूर्त घोषणा दिल्या जातात, ‘प्रियांका गांधी आंधी है, दुसरी इंदिरा गांधी है.’
प्रियांका गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १६ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात जवळपास १०८ जाहीर सभा व रोड शो केले. त्यांच्या विचारप्रवर्तक सभांना गर्दी होऊ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार जात, धर्म, पंथ, प्रांत या भोवतीच फिरत राहिला. याउलट प्रियांका गांधी यांची भाषणे महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अन्याय-अत्याचार, देशाची आर्थिक स्थिती व भाजपचे फोडाफोडीचे राजकारण याभोवती केंद्रित झाली. जो तुम्हाला रोजीरोटी देऊन तुमचे जीवनमान उंचावण्याची भाषा करेल त्यालाच आपले अमूल्य मत देऊन आपला विवेक शाबूत ठेवा, असे आवाहन करताना त्या दिसत होत्या. जाती-धर्माच्या नावावर तुम्ही मते देऊ नका, असेही त्या ठामपणे सांगत होत्या. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळसूत्राचा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून प्रियांका गांधी यांनी रुद्रावतार धारण करीत मोदींना खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या, ‘काँग्रेसने मागील ५५ वर्षे देशावर राज्य केले; परंतु कधीही देशवासीयांचे सोने अथवा मंगळसूत्र हिसकावून घेण्याची भाषा केली नाही. जेव्हा देशावर युद्धाचे संकट गहिरे झाले होते, तेव्हा स्वर्गीय इंदिराजींनी आपले सोने या देशाला दिले. त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केले. माझ्या आईने या देशासाठी स्वतःच्या मंगळसूत्राचा त्याग केलाय.’
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केवळ सोनिया गांधी यांना एक मुलगी म्हणून साथ दिली नाही, तर एक सच्ची बहीण म्हणून आपला भाऊ राहुल गांधी यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांना मानसिक आधार दिला. मोदींचा गांधी परिवारावरील हल्ला त्यांनी तितक्याच खंबीरपणे परतवून लावला. त्यांनी काँग्रेसला हिमाचल प्रदेश, कर्नाटक राज्यामध्ये विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर लोकसभेत काँग्रेसचे संख्याबळ ५२ वरून शंभरवर नेण्याच्या कामात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता त्या केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रणमैदानात उतरणार आहेत. त्या संसदेत पोहोचल्यास राहुल गांधी व प्रियांका गांधी यांचा सामना करणे सत्ताधाऱ्यांना निश्चितच जड जाणार आहे. प्रियांका या जनतेच्या प्रश्नांनाच नव्हे, तर विरोधकांनाही तितक्याच आक्रमकपणे भिडतात. ज्या दिवशी त्यांची लोकसभेत एंट्री होईल, तो दिवस भारतीय राजकारणाला नवी दिशा देतो की कसे, याचे उत्तर येणारा काळच देईल.
(prakashrsawant@gmail.com)