हारून शेख/लासलगाव
नाफेडचा मागील दोन आठवड्यातील दर २१०५ रुपये प्रति क्विंटल होता व या आठवड्यासाठी कांदा खरेदीदर २५५५ रुपये प्रतिक्विंटल असा ठरविण्यात आला आहे. तथापि, बाजार समित्यांमध्ये सद्य:स्थितीत २८०० रुपयापर्यंत सरासरी दर मिळत असल्यामुळे नाफेडचा दर कमीच असल्याने कांदा उत्पादक नाराज झाले असून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे.
बाजार समित्यांमध्ये कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे, तर दुसरीकडे नाफेड खरेदी करत असलेल्या कांद्याचे दर निश्चितीचे अधिकार ‘डोका’ला
उत्पादकांच्या डोळ्यात पाणी!
मिळाल्यानंतर पहिल्या आठवड्यासाठी २१०५ रुपये प्रति क्विंटल दर ठरवला. तो दोन आठवडे होता मात्र बाजार समितीत विक्री होत असलेल्या बाजारभावापेक्षा हा दर पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एनसीसीएफच्या खरेदीकडे पाठ फिरवली होती. पुढील आठवड्यात या दरात वाढ होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात या आठवड्याचा नाफेडचा कांदा खरेदीचा दर २५५५ प्रतिक्विंटल इतका राहिला आहे.
कार्यपद्धतीत बदल करावा
नाफेड ही संस्था व्यापारी पिढी नसून कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्याचे काम ही संस्था करते नाफेडची कांदा खरेदी विक्री याबाबत सखोल अभ्यास करून कार्यपद्धतीत बदल करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान,वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना ई-मेल द्वारे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष बापूराव पिंगळे यांनी निवेदन पाठविले आहे.
नाफेडने राज्यातील बाजार समित्यामधून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक बाजारात कांद्याच्या दरात घसरण झाल्यानंतर बाजारात उतरून नाफेडने कांदा खरेदी करायला हवे होते; परंतु तेव्हा ती केले नाही यावरून नाफेडची भूमिका संशयास्पद वाटते. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असेही पिंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दिल्लीतूनच ठरताहेत कांद्याचे दर
केंद्र सरकारच्या बफरस्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरवले जात होते. आता नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून ठरवणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात आजही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात मिळणाऱ्या दरापेक्षा नाफेडचे दर कमीच आहेत. मागील दोन आठवड्यांसाठी नाफेडच्या कांदा खरेदीचे प्रतिक्विंटलसाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा दर हा २१०० रुपये होता. मात्र या आठवड्यात दर वाढवूनही बाजार समित्यामध्ये मिळणाऱ्या दरामध्ये तफावत आहे.
तर नाफेडला कांदा दिला जाणार नाही..
मंगळवारी दिल्लीतून ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या आठवड्यासाठी नाफेड कांदा खरेदीचा दर २५५५५ रुपये प्रति क्विंटल इतका ठरवला आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला लिलावात २८००-३००० पर्यंत प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. मात्र केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचे दर बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून कांदा उत्पादक नाफेड व एनसीसीएफला कांदा विक्री करणार नाही असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले .