नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नियंत्रणरेषेवर पाकिस्तानने १०० हून अधिक लष्करी कर्मचाऱ्यांना गमावल्याचे समजते. पाकिस्तानी सैन्याने श्रद्धांजली स्वरूपाचे पुरस्कार जाहीर केल्याच्या यादीवरून हे कळते, अशी माहिती भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल ‘डीजीएमओ’ राजीव घई यांनी दिली.
ते म्हणाले की, मे महिन्यातील संघर्षात पाकिस्तानने किमान १२ विमाने गमावली, हा तपशील काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीशी जुळतो.
लेफ्टनंट जनरल घई म्हणाले की, भारतीय नौदल पूर्णपणे तयार होते. जर पाकिस्तानने संघर्ष सुरू ठेवला असता तर समुद्रातूनच नव्हे तर इतर बाजूंनीही त्यांच्यासाठी परिस्थिती गंभीर ठरू शकली असती.
७ ते १० मेदरम्यान झालेल्या घडामोडींची माहिती देताना ते म्हणाले की, भारताने ७ मे रोजी नऊ दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने जलदपणे सीमेवरून गोळीबार सुरू केला. पाकिस्तानने कदाचित अनवधानाने १४ ऑगस्ट रोजी आपली पुरस्कार यादी प्रसिद्ध केली आणि त्यांनी दिलेल्या मृत्यूनंतरच्या पुरस्कारांच्या संख्येवरून आता आपल्या लक्षात येते की त्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील १०० हून अधिक सैनिक ठार झाले, असे त्यांनी सांगितले.
घई यांनी सांगितले की, दोन्ही देशांचे ‘डीजीएमओ’ बोलल्यानंतरही पाकिस्तानने ड्रोन पाठवले. विविध प्रकारचे आणि श्रेणीचे ड्रोन आपल्या जवानांना व साधनसंपत्तीस हानी पोहचवण्याच्या प्रयत्नासाठी वापरले गेले. परंतु सर्व काही अपयशी ठरले.
आम्ही त्यांचे ११ विमानतळ लक्ष्य केले. त्यांचे आठ विमानतळ, तीन हँगर आणि चार रडार नष्ट झाले. पाकिस्तानी हवाई साधने जमिनीवर नष्ट झाली, असे त्यांनी सांगितले.