नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. तब्बल ५० खासदारांनी या प्रस्तावावर सह्यादेखील केलेल्या आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून जगदीप धनखड हे पक्षपात करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. ते विरोधी पक्षांच्या खासदारांना संधी देत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेससह टीएमसी, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी मंगळवारी गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांशी सभापती चर्चा करणार असल्याची माहिती असून सभागृहातील कोंडी दूर करण्यासाठी सभापती चर्चा करणार आहेत.
राज्यघटनेच्या कलम ६७ (बी) अंतर्गत विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. सोमवारीसुद्धा संसदेच्या दोन्ही सभागृहांतील गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभेत अधूनमधून गदारोळ झाला आणि सभागृह अनेकवेळा ठप्प पडले. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. जगदीप धनखड यांनी विरोधी खासदारांच्या वृत्तीबद्दल दु:ख व्यक्त केले. ते कामकाजात अडथळा आणत आहेत आणि लोकशाहीच्या मंदिरात चर्चा टाळत आहेत, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधी पक्षांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. एनडीएच्या खासदारांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर विदेशी संस्था आणि लोकांच्या माध्यमातून देशाचे सरकार आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी अदानी समूहाशी संबंधित मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तीन तासांनंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले. पण तेव्हाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. विरोधी पक्षातील काही सदस्य आपल्या जागेवरून पुढे आले. या गोंधळादरम्यान, अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी त्यांच्या चेंबरमध्ये बैठक घेतली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या चेंबरमध्ये पुन्हा बैठक होणार आहे. यानंतर त्यांनी सर्व सदस्यांना संविधानाच्या शपथेचा काळजीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
लोकसभा उपाध्यक्षांची अद्याप निवडणूक नाही!
अठराव्या लोकसभेच्या तिसऱ्या (हिवाळी) अधिवेशनाचा निम्म्याहून अधिक काळ संपला तरी अद्याप लोकसभा उपाध्यक्षांची निवडणूक झालेली नाही. संसदीय परंपरेप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना मिळणे अपेक्षित असताना विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीनेही यासाठीचा प्रयत्न सोडून दिल्यात जमा आहे. त्यामुळे हे अधिवेशनही उपाध्यक्षांविनाच पार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरला सुरू झाले असून २० डिसेंबरला सांगता होणार आहे. या अधिवेशनात सरकारकडून लोकसभा उपाध्यक्षांच्या निवडणुकीबाबत अद्याप काहीही संकेत देण्यात आलेले नाहीत.