स्वच्छता करुन घेताना विधानसभा अध्यक्ष सतीश महाना व्हायरल व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

उत्तर प्रदेश विधानसभेत पानमसाला 'बॅन', आमदारांच्या थुंकण्याच्या प्रकारानंतर निर्णय

"मी संबंधित सदस्याला व्हिडिओमध्ये पाहिले आहे, मात्र कोणाचाही अपमान करायचा नाही म्हणून मी त्यांचे नाव घेत नाही. जर त्यांनी स्वतः माझ्याकडे येऊन आपली चूक मान्य केली, तर ठीक आहे, अन्यथा...

Krantee V. Kale

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आता पानमसाल्याच्या सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी एका आमदाराला सभागृहाच्या परिसरात थुंकताना पाहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पानमसाला सेवन करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर एक हजार रुपये दंड आकारला जाईल. महत्वाचे म्हणजे, याआधीही २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घातली होती.

अध्यक्ष म्हणाले, कोणाचाही अपमान करायचा नाही म्हणून नाव घेत नाही

उत्तर प्रदेश विधानसभेचे बजेट सत्र सुरू असून मंगळवारी, सत्राच्या नवव्या दिवशी एक अनोखा प्रसंग घडला. सत्राची सुरुवात होताच विधानसभा अध्यक्ष सतीश महाना आपल्या आसनावर बसले आणि लगेचच त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले. अध्यक्ष महाना म्हणाले, "आज सकाळी मला माहिती मिळाली की, आमच्या एका माननीय सदस्याने विधानसभेच्या हॉलमध्ये पानमसाला खाऊन आपली 'सेवा' दिली आहे. हे ऐकल्यावर मी येथे आलो आणि संपूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश दिले. मी संबंधित सदस्याला व्हिडिओमध्ये पाहिले आहे, मात्र कोणाचाही अपमान करायचा नाही म्हणून मी त्यांचे नाव घेत नाही."

स्वतः चूक मान्य केली, तर ठीक आहे, अन्यथा...

पुढे बोलताना अस्वच्छतेच्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत महाना म्हणाले, "माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की, पुढे जर कोणी अशा प्रकारे विधानसभेत अस्वच्छता करताना दिसले, तर त्यांना थांबवा. कृपया माझे म्हणणे समजून घ्या. ही फक्त अध्यक्षाची विधानसभा नाही, तर उत्तर प्रदेशच्या २५ कोटी जनतेची आहे. ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. अध्यक्ष महाना पुढे म्हणाले, "मी संबंधित सदस्याचे नाव जाहीर करणार नाही. जर त्यांनी स्वतः माझ्याकडे येऊन आपली चूक मान्य केली, तर ठीक आहे, अन्यथा मला त्यांना बोलवावे लागेल."

या प्रकारानंतर विधानसभा परिसरात पानमसाला आणि गुटख्यावर बंदी घालण्यात आली असून, उल्लंघन केल्यास ₹१,००० दंड आकारला जाणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस