नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित फुटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. कोणत्याही फुटीर गटाला मान्यता देण्यापूर्वी मूळ पक्षाची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. जर कोणताही गट त्यांच्याकडे आला, तर सर्वप्रथम आम्हाला त्याची माहिती द्यावी, अशी आमची मागणी आहे.
ठाकरे गट कायदेशीर आक्षेप घेण्याच्या तयारीत
सध्या उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांदरम्यान देसाई यांनी पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. कुठल्याही पक्षाचे विलिनीकरण होऊ शकते. मात्र, एखादा गट दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही, असा दावा त्यांनी केला.त्यामुळे संभाव्य फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता देणे किंवा त्यानंतर दुसऱ्या पक्षात सामील होण्याच्या प्रक्रियेवर ठाकरे गट कायदेशीर आक्षेप घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळाले आहेत.