जागतिक मंदीपाठोपाठ जगाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पसरलेल्या कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांची जगण्याची धडपड सुरू असतानाच, देशात महागाईचा भस्मासुर चौफेर उधळला आहे. या महागाईने सामान्यांचे अर्थकारण पार कोलमडले आहे. त्यातच स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, पेट्रोल-डिझेल-सीएनजीच्या किमती भडकल्या आहेत. परिणामी, देशातील गोरगरीब नागरिकांचा भुकेचा प्रश्न तीव्र झाला आहे. देशापुढील या मूलभूत प्रश्नावरून सामान्यांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी देशात जातीय, धार्मिक मुद्द्यांच्या आधारे समाजासमाजात भेदाभेद निर्माण करण्याचे प्रयत्न बिनबोभाट सुरू राहिले. मंदिर-मशिदीचे वाद उकरून काढून या प्रश्नांचे राजकीय भांडवल करण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. त्यासाठी देशातील हिंदुत्ववादी संघटना फारच आक्रमक झाल्या. त्यांच्या नेत्यांची वक्तव्ये केवळ चिथावणीखोरच नव्हती, तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारीही होती. यातून दोन समाजातील मतभेदाच्या भिंती वाढत गेल्या. दोन समाजात संशयाचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरत गेले. यासंदर्भात विविध व्यासपीठांवरून सातत्याने नाराजीचा सूर व्यक्त होत असतानाही, केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या नेत्यांनी त्याची साधी दखलही घेतली नाही. उलट, सोयीस्कर मौन पाळून त्याचे छुपे समर्थन केले. त्यामुळेच भाजप, संघ आणि त्यांचे छुपे समर्थक यांच्या वादग्रस्त वक्तव्यात काहीही खंड पडला नाही. परिणामी, देशातील सामाजिक वातावरण कलूषित होत गेले. या दूषित वातावरणाचे पडसाद संपूर्ण देशातच उमटले नाहीत, तर त्याची आता आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही दखल घेतली जाऊ लागली आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील एका चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपचे माध्यमप्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजपने नुपूर शर्मा यांचे सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे, तर नवीनकुमार जिंदाल यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. या दोघांच्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद जगभरात विशेषत: आखाती देशांमध्ये उमटत आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तसेच, भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लामिक देशांच्या संघटनेनेही निषेध नोंदविला आहे. अरब देशांमध्ये ट्विटरवर ‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’, असा हॅशटॅग चालवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. कतारने तेथील भारतीय राजदूतांना पाचारण करून नुपूर शर्मा यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला असून, भारत सरकारने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली. मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांवर जगभरातील दोन अब्ज मुस्लीम चालतात, असे कतारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलेय. धार्मिक द्वेष पसरवणारी ही वक्तव्य जगभरातील मुस्लीम समुदायाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कतार सर्व धर्मांच्या, सर्व देशांच्या नागरिकांच्या प्रति सहिष्णुता, समान मूल्यांचा स्वीकार करते, असे म्हटले गेले आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबद्दल ओमानचे ग्रँड मुफ्ती यांनीदेखील प्रश्न उपस्थित केले होते. कतारपाठोपाठ कुवेत आणि इराणनेदेखील नाराजी व्यक्त केलीय. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राजदूत दीपक मित्तल यांनी आपल्या देशाची बाजू सावरण्याचा प्रयत्न चालविला आहे. कोणत्याही व्यक्तीकडून किंवा पक्षाच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आलेल्या व्यक्तिगत मताशी भारत सरकारचा संबंध नाही. भारत सरकार संविधानातील मूल्यांवर चालते. भारत एकतेवर विश्वास ठेवते. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मित्तल यांनी दिली आहे. त्याचबरोबर सर्व धर्माबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणे पक्षाला मान्य नाही, असे स्पष्टीकरण भाजपने रविवारी दिले आहे. मुळात भारतासारख्या लोकशाहीवादी देशात विविध जाती, धर्म, पंथ, प्रांत यांचे लोक आजवर गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले. उच्चसंस्कृती परंपरा, सर्वधर्मसमभावाच्या, समतेच्या मूल्यांवरच भारताची आजवरची वाटचाल आणि प्रगती झालेली आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचीच भूमिका आजवरच्या प्रत्येक सरकारने घेतलेली आहे. तथापि, अलीकडच्या काळात भारतात हिंदू-मुस्लीम यांच्यातील मतभेदांची दरी वाढवून राजकीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले. हे प्रयत्न एक ना एक दिवस अंगलट येणारच होते. त्याची सुरुवात आखाती देशांमधून झाली व ती अन्य देशात पसरली तर देशाच्या व्यापारउदिमावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे. तेव्हा ‘पेराल तसे उगवेल, याचे भान ठेवूनच सत्ताधाऱ्यांनी व त्यांच्या अनुयायांनी आत्मपरीक्षण केलेले बरे.