नवी दिल्ली : सध्याचे युग हे युद्धाचे नाही, मात्र ते दहशतवादाचेही नाही. पाकिस्तान ज्या पद्धतीने दहशतवादाला पाठिंबा देत आहे, त्यावरून एक दिवस पाकिस्तान स्वत:च नष्ट होईल. आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसल्याचा परिणाम काय होतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे, मात्र हे ‘मिशन’ अद्याप संपलेले नाही, अशा कडक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पाकिस्तानला इशारा दिला.
पाकिस्तानसोबत युद्धविराम झाल्यानंतर तीन दिवसांनी पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, “भारत आता यापुढे कोणताही दहशतवाद सहन करणार नाही. पाकिस्तानचे सरकार दहशतवाद्यांना ज्याप्रकारे पोसते, त्यामुळे एक दिवस ते पाकिस्तानलाच संपवतील. दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. यापुढे पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. आज मी सगळ्या जगाला सांगतो की, यापुढे जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. प्रत्येक भारतीयाला ही शांतता लाभली पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, यासाठी भारत शक्तिशाली असणे गरजेचे आहे.”
“दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ‘ऑपरेशन सिंदूर’ने नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. यापुढे जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला अशाच प्रकारे योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या अटींवर प्रतिसाद देऊ. जिथे दहशतवाद्यांची मुळे उफाळून येतील, तिथे आम्ही कठोर कारवाई करू. भारत यापुढे कोणत्याही प्रकारच्या आण्विक हल्ल्याच्या धमक्या सहन करणार नाही. भारत पाकच्या आश्रयाखाली वाढणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. आम्ही यापुढे दहशतवादाला आश्रय देणारे आणि दहशतवादाचे सूत्रधार यांना वेगळे घटक म्हणून पाहणार नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, पाकिस्तानी सैन्याचे उच्च अधिकारी मृत दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात एकत्र आले, तेव्हा जगाने पाकिस्तानचे कुरूप सत्य पाहिले. हा राज्यपुरस्कृत दहशतवादाचा मोठा पुरावा आहे. आम्ही युद्धभूमीवर प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभूत केले आहे,” असेही मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
भारताच्या कठोर हल्ल्याची दहशतवाद्यांना कल्पना नव्हती!
“ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही, तर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मेच्या मध्यरात्री आणि ७ मेच्या पहाटे संपूर्ण जगाने ही प्रतिज्ञा पूर्ण होताना पाहिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, याची दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती. पण जेव्हा देश एकजूट असतो, राष्ट्र प्रथम या भावनेने भारलेला असतो, तेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते, तेव्हा कठोर निर्णय घेतले जातात,” असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
“मी आज पुन्हा एकदा सांगतो, भारताने पाकिस्तान विरोधातील कारवाई ही फक्त स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने आगळीक केली तर त्याला असेच चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. कोणतेही आण्विक ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. भारतावर आता दहशतवादी हल्ला झाला तर करारा जवाब मिळेल. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एका सुरात उभा राहिला,” असेही मोदी म्हणाले.
“पाकिस्तानने आमचे गुरुद्वारा, घरे, मंदिरे आणि शाळा लक्ष्य केल्या. पाकिस्तानने लष्करी तळांना लक्ष्य केले, पण यामध्ये पाकिस्तान स्वत: उघडा पडला. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताने गवताच्या काडीप्रमाणे पाडली. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना आकाशातच उद्ध्वस्त केले. पाकिस्तान सीमेवर हल्ला करण्यास तयार होता, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर हल्ला केला. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अचूक मारा केला. पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसचे मोठे नुकसान केले. पहिल्या तीन दिवसांत पाकिस्तान इतका उद्ध्वस्त झाला की, त्यांनी त्याची कल्पनाही केली नव्हती. भारताच्या आक्रमक कारवायांनंतर पाकिस्तानने सुटकेचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी विनवणी करत होता. अखेर १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी सैन्याने आमच्या डीजीएमओशी संपर्क साधला. तोपर्यंत आम्ही दहशतवादाच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले होते, दहशतवाद्यांना मारले होते आणि दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केले होते. जेव्हा पाकिस्तानने आवाहन केले आणि सांगितले की, ते यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवाया किंवा लष्करी साहसात सहभागी होणार नाहीत, तेव्हा भारताने त्यांच्या विनंतीचा विचार केला,” असा युद्धविरामाबाबतचा घटनाक्रमही मोदींनी उलगडून सांगितला.
सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम
गेल्या काही दिवसांत आपण देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्यावतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवले. आज मी त्यांचे शौर्य, धाडस आपल्या देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीला समर्पित करतो, असे मोदी यांनी सांगितले.
दहशतवादाचे मुख्यालयच आम्ही उद्ध्वस्त केले!
बहावलपूर आणि मुरीदकेसारखी दहशतवाद्यांची छावणी ही एकप्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठे राहिली आहेत. जगात झालेला ९/११ चा हल्ला असो किंवा लंडन ट्यूब बॉम्बस्फोट किंवा भारतातील मोठे दहशतवादी हल्ले, या सर्वांचा संबंध या दहशतवादी तळांशी जोडलेला आहे. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचे सिंदूर नष्ट केले होते, म्हणून भारताने दहशतवादाचे हे मुख्यालयच उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक कुख्यात दहशतवादी मारले गेले, असे मोदी यांनी स्पष्ट केले.