राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींना कुवैतचा सर्वोच्च नागरी सन्मान; ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ने सन्मानित

कुवैत दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांना दुसऱ्या दिवशी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ या कुवैतमधील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

Swapnil S

कुवैत सिटी : कुवैत दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांना दुसऱ्या दिवशी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ या कुवैतमधील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे. कुवैतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित केले. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा कुवैतचा नाइटहूड ऑर्डर आहे. हा पुरस्कार राष्ट्रप्रमुख आणि परदेशी राज्यकर्ते आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो. यापूर्वी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या जागतिक नेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतर देशांकडून मिळालेला हा २० वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी कुवैतच्या ‘बायन पॅलेस’ येथे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. कुवैतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कुवैतला पोहोचले आहेत. गेल्या ४३ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी १९८१ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुवैतला भेट दिली होती.

“कुवैतच्या अमीरांसोबत छान भेट झाली. आम्ही फार्मास्युटिकल्स, आयटी, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही आमची भागीदारी धोरणात्मक पातळीवर नेली आहे आणि मला आशा आहे की, आमची मैत्री आगामी काळात आणखी घट्ट होईल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

“मी येथे काम करणाऱ्या भारतीय मजूर आणि कर्मचाऱ्यांना भेटलो. ते इथल्या बांधकामात गुंतलेले आहेत. कुवैतच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी भारतीय समुदायातील डॉक्टर आणि परिचारिका ही मोठी ताकद आहे. कुवैतची पुढची पिढी मजबूत करण्यासाठी भारतीय शिक्षक मदत करत आहेत. तसेच भारतीय अभियंते कुवैतच्या पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत. मी जेव्हा कुवैतच्या नेतृत्वाशी बोलतो, तेव्हा ते तुमचे खूप कौतुक करतात. कुवैती नागरिकही भारतीयांचा त्यांचे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कौशल्याबद्दल आदर करतात,” असे मोदी यांनी म्हटले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन