राष्ट्रीय

प्रयागराजमध्ये भाविक अडकले चक्रव्यूहात; संगम रेल्वे स्टेशन बंद, ३५० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, ५-६ तासांच्या प्रवासासाठी लागताहेत २४ तास

प्रयागराजमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला कुंभमेळा आता समाप्तीकडे चालला असून त्रिवेणी संगमात स्नान करून पुण्य मिळवण्यासाठी आता लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

Swapnil S

प्रयागराज : प्रयागराजमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला कुंभमेळा आता समाप्तीकडे चालला असून त्रिवेणी संगमात स्नान करून पुण्य मिळवण्यासाठी आता लोकांची गर्दी वाढू लागली आहे. लोकांच्या श्रद्धेची लाट वाढत चालली असतानाच, प्रयागराजमध्ये मात्र वाढत्या गर्दीमुळे अभूतपूर्व ‘ट्रॅफिक जॅम’ची समस्या निर्माण झाली आहे. प्रयागराजला जाताना मध्य प्रदेशातील जबलपूर ते प्रयागराज या संपूर्ण ३५० किमी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतण्याच्या सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत. प्रयागराज संगम रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमल्याने स्टेशन बंद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३० वर लाखो वाहने अडकली आहेत. ती हळूहळू महाकुंभात पोहोचत आहेत. जबलपूरहून प्रयागराजला पोहोचण्यासाठी साधारणतः ५ ते ६ तास लागतात, मात्र सध्या ‘ट्रॅफिक जॅम’मुळे तब्बल २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. रेवा गावाजवळ इतिहासातील सर्वात वाईट वाहतूककोंडी झाली आहे. जबलपूर ते प्रयागराज या मार्गावरील सर्व हॉटेल्स, लग्नाचे लॉन, ढाबे लोकांनी खचाखच भरलेले आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक इत्यादी दक्षिणेकडील राज्यांमधून लाखो भाविक जबलपूरच्या या मार्गाने दररोज प्रयागराजला पोहोचत आहेत. यामुळेच प्रयागराजला जाणाऱ्या मार्गांवर तसेच परतीच्या मार्गांवर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.

प्रयागराज शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर कोंडी होत असल्याने कुंभमेळ्यापर्यंत जाण्यासाठी नागरिकांना २० ते २५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. प्रयागराजला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते वाराणसी, जौनपूर, मिर्झापूर, कौशांबी, प्रतापगड, रीवा आणि कानपूर मार्गाने जोडलेले आहेत. वाहनांमध्ये अडकलेल्या भाविकांना मेळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना तासन‌्तास अन्न-पाण्यावाचून राहावे लागत आहे. शहराबाहेरील महामार्गालगत प्रशासनाने स्वतंत्र वाहनतळ तयार केले आहेत. मात्र, बहुतांश वाहनतळ भरल्याने वाहने रस्त्यावरच अडकून पडली आहेत. ही प्रचंड कोंडी दूर करण्यासाठी नागरी आणि वाहतूक पोलिसांबरोबरच निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. बालसन चौक, छोटा बघरा, बांगर धर्मशाळा चौक, जनसनगंज चौक अशा प्रमुख ठिकाणी चालणेही अवघड झाले आहे.

भोपाळहून येणारे आणि कटनी मार्गे प्रयागराजला जाणारे लोक शाहपुरा-सहजपूर टोलनाक्यावर थांबले आहेत. कुंभमेळ्यामुळे या मार्गावरील सर्व प्रमुख जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेवामध्ये झालेल्या मोठ्या वाहतूककोंडीनंतर रेवा तसेच सतना, मैहर आणि जबलपूर येथील पोलीस महामार्गावर तैनात करण्यात आले आहेत. महामार्गावर आळीपाळीने पोलीस कर्मचारी तैनात केले जात आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, पोलीस आणि प्रशासन अनेक ठिकाणी अन्न, पाणी आणि इतर गोष्टींची व्यवस्था करत आहेत.

वकील कोर्टात न पोहोचल्याने सुनावण्या लांबणीवर

प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पोहोचण्यासाठी प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. या वाहतूककोंडीची झळ फक्त उत्तर प्रदेशच नाही, तर आजूबाजूच्या राज्यांनाही सहन करावी लागत आहे. या वाहतूककोंडीचा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कामकाजावरही परिणाम झाला. वकील कोर्टात पोहोचू न शकल्याने अनेक सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या. सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर ‘अल्ट न्यूज’चे पत्रकार आणि ‘फॅक्ट चेकर’ मोहम्मद झुबेर यांनी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्या. सिद्धार्थ वर्मा आणि न्या. योगेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठापुढे सुरू असलेली ही सुनावणी वकील पोहोचू न शकल्याने पुढे ढकलण्यात आली.

प्रयागराजच्या रहिवाशांना मनस्ताप

एकीकडे प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी आणि आग लागण्याच्या घटना घडत असतानाच, कोटींच्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे आता स्थानिक रहिवाशांना मात्र कुंभमेळ्याचा मनस्ताप होऊ लागला आहे. घाण, वाहतूककोंडी आणि प्रचंड वाढलेले प्रत्येक वस्तूचे दर यामुळे येथील स्थानिक नागरिक भरडला जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाला स्थानिक नागरिकांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री