(Photo-X/@PIBFactCheck)
राष्ट्रीय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने गुंतवणुकीचा खोटा दावा; PIB कडून AI Videoचा पर्दाफाश

फक्त ₹२३ हजारांची गुंतवणूक करून दररोज ₹७०,००० आणि महिन्याला तब्बल ₹२१ लाखांची हमी राष्ट्रपती देत असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

सध्या सोशल मीडियावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फक्त ₹२३ हजारांची गुंतवणूक करून दररोज ₹७०,००० आणि महिन्याला तब्बल ₹२१ लाखांची हमी राष्ट्रपती देत असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असून हा व्हिडिओ AI-जनरेटेड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत सरकारच्या PIB Fact Check युनिटने या व्हायरल व्हिडिओचा पर्दाफाश करत तो खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे जाहीर केले आहे. PIB ने स्पष्टपणे सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशा कोणत्याही गुंतवणूक प्लॅटफॉर्मला पाठिंबा दिलेला नाही.

फिशिंग स्कॅमचा धोका, लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा

PIB च्या माहितीनुसार, अशा प्रकारचे व्हिडिओ नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वापरले जात असून, त्यामध्ये दिलेल्या लिंक फिशिंग स्कॅम असण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

PIB ने यासोबतच, राष्ट्रपतींनी एक महिन्यापूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त केलेल्या मूळ भाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या मूळ भाषणाचा गैरवापर करून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला होता.

यापूर्वीही फसवणुकीचा प्रयत्न

याआधी डिसेंबर महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये दर तासाला ₹५००० कमाई आणि सहा महिन्यांत ₹१ कोटी उत्पन्नाचा दावा करण्यात आला होता.

त्यावेळीही, PIB ने त्वरित हस्तक्षेप करत हा व्हिडिओ फेक असल्याचे स्पष्ट केले होते आणि भारत सरकार किंवा अर्थमंत्र्यांनी अशा कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नसल्याचे सांगितले होते.

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

PIB ने नागरिकांना इशारा दिला असून, सोशल मीडियावरील गुंतवणुकीचे आकर्षक दावे, मोठ्या कमाईची हमी देणारे व्हिडिओ, प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने केलेले प्रमोशन यावर विश्वास ठेवू नये, तसेच आर्थिक फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन केले आहे.

मोठी बातमी! मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास थेट मेट्रोने; ३५ किमीच्या प्रकल्पाला सरकारची मंजुरी

उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरण : सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात सुनेचा छळ; दीप्तीसोबत नेमकं काय झालं? आईने केला खुलासा

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल