नवी दिल्ली : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी चार लाखांहून अधिक मताधिक्य घेतल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे.
लोकसभेच्या वायनाड मतदारसंघात प्रियांका यांची लढत मुख्यत्वे एलडीएफचे सत्यन मोकेरी आणि भाजपच्या नव्या हरिदास यांच्याशी होती. त्यामध्ये प्रियांका यांना चार लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले, तर मोकेरी आणि हरिदास हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर गेले.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र मुख्य लढत प्रियांका, मोकेरी आणि हरिदास यांच्यातच होती. त्यामध्ये प्रियांका यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली.
नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा १,४५७ मतांनी विजय झाला आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ मते मिळाली, तर भाजपच्या डॉ. संतुकराव हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३२१ मते मिळाली.