राष्ट्रीय

मणिपूरमध्ये आंदोलक आक्रमक : संचारबंदीचे उल्लंघन - पोलिसांच्या कारवाईत २५ हून अधिक जखमी

केंद्रातील डबल इंजिन सरकारसाठी मणिपूरमध्ये परिस्थिती 'सामान्य' आहे

नवशक्ती Web Desk

इम्फाळ : मणिपूरच्या ५ जिल्ह्यांमध्ये बुधवारी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, बिष्णुपूर जिल्ह्यातील फौगाकचाओ इखाई येथे नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करत निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी बॅरिकेड्सचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्यामुळे २५ हून अधिक लोक जखमी झाले. त्यात बहुतेक महिला होत्या. जखमींना तातडीने बिष्णुपूर जिल्हा रुग्णालयात आणि इतर जवळच्या सुविधांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कर्फ्यूचे उल्लंघन करून शेकडो स्थानिक बिष्णुपूर जिल्ह्यातील ओइनम येथे त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि इम्फाळहून फौगाकचाओ इखाईला जात असलेल्या पोलिस आणि इतर केंद्रीय दलाच्या कर्मचाऱ्यांच्या हालचाली रोखण्यासाठी रस्त्याच्या मधोमध बसले. मणिपूर इंटिग्रिटीच्या समन्वय समितीने फौगाकचाओ इखाई येथे सैन्याच्या बॅरिकेड्सवर तुफान हल्ला करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत बिष्णुपूर जिल्ह्यात लोक जमले होते आणि त्यांना चुडाचंदपूरच्या दिशेने पुढे जावे अशी मागणी केली होती.

अपुनबा मणिपूर कानबा इमा लुप (एएमकेआयएल) संघटनेचे अध्यक्ष लॉरेम्बम नगानबी यांनी पत्रकारांना सांगितले की, ३ मे रोजी हिंसाचार भडकल्यानंतर टोरबुंग येथे घर सोडून पळून गेलेल्या शेकडो मैतेई बॅरिकेड्समुळे त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत. आम्ही फक्त अशी मागणी करत आहोत की, त्यांना स्थलांतरित केले जावे, जेणेकरून लोक त्यांच्या घरी जाऊ शकतील. मणिपूर इंटिग्रिटीने लोकांना बॅरिकेड्सवर हल्ला करण्याचे आवाहन केले होते, कारण ३० ऑगस्टपर्यंत बॅरिकेड्स हटवण्याच्या त्यांच्या वारंवार केलेल्या विनंत्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले होते.

काँग्रेसची सरकारवर टीका

मणिपूरमधील कलहावरून काँग्रेसने बुधवारी केंद्रावर हल्ला चढवला आणि म्हटले की, चार महिन्यांनंतरही हिंसाचार सुरूच आहे. परंतु मोदी सरकारसाठी राज्यात परिस्थिती सामान्य आहे. मणिपूरच्या पाच जिल्ह्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू झाल्यानंतर काँग्रेसने हा आरोप केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, नवी दिल्लीत जी-२० परिषद होत आहे, तर मणिपूरच्या ५ जिल्ह्यांत पुढील ५ दिवस संपूर्ण संचारबंदी असेल. चार महिन्यांनंतरही हिंसाचार सुरूच आहे, पण केंद्रातील डबल इंजिन सरकारसाठी मणिपूरमध्ये परिस्थिती 'सामान्य' आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण