सीओईपीतील राड्यानंतर काँग्रेस-अभाविप आमनेसामने; ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे; राजकीय सूडबुद्धीने खोट्या तक्रारींचा आरोप 
राष्ट्रीय

सीओईपीतील राड्यानंतर काँग्रेस-अभाविप आमनेसामने; ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे; राजकीय सूडबुद्धीने खोट्या तक्रारींचा आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सीओईपीच्या वसतिगृहात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद उमटले आहेत.

Swapnil S

पुणे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सीओईपीच्या वसतिगृहात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांच्यासह सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, काँग्रेसने ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने आणि खोट्या तक्रारींच्या आधारे करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

शिवाजीनगर पोलिसांच्या माहितीनुसार, सीओईपीच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीवर दबाव आणून तिचा व्हिडिओ जबाब नोंदवून घेतल्याची माहिती तक्रारदार मल्हार निलेश पाटील यांना मिळाली. या प्रकरणाची विचारपूस करण्यासाठी मल्हार पाटील हे सहकाऱ्यांसह वसतिगृहात गेले असता, तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्षय जैन यांच्यासह पुष्कर आबनावे, भूषण राणभरे, सौरभ आमराळे, सागर धडवे आणि प्रथमेश आबनावे यांच्यासह युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अमर काळंगे पुढील तपास करीत आहेत.

थोरातांकडून सरकारवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या घटनेवरून भाजप सरकारवर टीका केली. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुण्यात येत असताना आपले प्रश्न मांडू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींवर दबाव आणणे किंवा त्यांना कोंडून ठेवणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष कॅमेऱ्यात काय चित्रण झाले आहे, हे तपासण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांच्या कथित गैरवापराचा निषेध केला.

सीओईपी परिसरात कलम १६३ लागू

सीओईपी परिसरात मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कलम १६३ लागू केले आहे. विद्यापीठ परिसरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू नये तसेच त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

काँग्रेसचा पोलिसांवर एकतर्फी कारवाईचा आरोप

काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. गुन्ह्यात नाव असलेला युवक काँग्रेस कार्यकर्ता सागर दाडवे हा घटनास्थळी उपस्थित नसतानाही त्याच्यावर दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. सीओईपीमध्ये एनएसयूआयने वाढीव विकास शुल्काच्या विरोधात तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. महिला कार्यकर्त्या विद्यार्थिनीला भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना भेटू न देता पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही करण्यात आला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पदपथांवरील 'आरे' स्टॉलवरही हातोडा; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत BMC करणार कारवाई; मुंबईतील १६०३ स्टॉलधारकांवर टांगती तलवार

तुकाराम मुंढे 'इफेक्ट'मुळे सलग दूध संकलनात घट; तीन महिन्यांत सव्वा लाख लिटरची घट, भेसळखोरांनी घेतला धसका

आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना PHD; एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार