भाजप-अकाली दलाची पुन्हा युती; पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्री: अमित शहा X|@NitinNabin
राष्ट्रीय

भाजप-अकाली दलाची पुन्हा युती; पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्री: अमित शहा

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची सहा वर्षांनंतर पुन्हा युती! अकाली दल एनडीएमध्ये परतला असून, पंजाबमध्ये युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री अकाली दलाचाच असेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली/चंडीगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात भूमिका घेऊन तब्बल अडीच दशके भाजपसमवेत असलेली युती तोडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी मंगळवारी सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा युती केली आहे. अकाली दल पुन्हा एनडीएमध्ये दाखल झाले असून, या युतीमध्ये अकाली दल मोठा भाऊ असल्याने पंजाबात मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच राहील, असे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.

भाजप मुख्यालयात अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत शहा यांनी युतीची घोषणा करून स्वागतही केले. दोन्ही पक्ष पंजाबमधील सर्व ११७ जागांवर एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपाचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी स्पष्ट केले.

अकाली दलच मोठा भाऊ...

अकाली दल युतीमध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावेल आणि युती सत्तेत आल्यास मुख्यमंत्रिपदही त्याच पक्षाला मिळेल, असे शहा यांनी सांगितले. २०२० मध्ये केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात अकाली दलाने भाजपसोबतची २४ वर्षांची युती तोडली होती.

आमीच युती भावनिक:सुखबीर सिंह बादल

अकाली दलाचे सुखबीर सिंह बादल यांनी ही युती राजकीय नसून भावनिक असल्याचे सांगितले. मात्र, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते परगत सिंह यांनी सत्तेच्या लालसेपोटी युती केल्याची टीका केली. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत.

लोकाभिमुख सरकारसाठी भाजप-अकाली कटिबद्ध - मोदी

शिरोमणी अकाली दल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करत, आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत ही आघाडी जनतेची पसंती ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. ‘पंजाब आणि पंजाबच्या जनतेचे कल्याण सर्वप्रथम! श्री गुरुनानक देव यांच्या प्रकाश पर्वाच्या दिवशी शिरोमणी अकाली दल पुन्हा एनडीए परिवारात सहभागी झाल्याचा मला अत्यंत आनंद आहे,’ असे मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.

नैसर्गिक युती

भाजप आणि अकाली दलाची युती नैसर्गिक असून, पंजाबला लोकाभिमुख सरकार देईल आणि राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे मोदी म्हणाले. अटलजी, अडवाणीजी आणि सरदार प्रकाशसिंह बादल यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती काळाच्या कसोटीवर टिकली आहे. आगामी निवडणुकीत ती जनतेची पसंती ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अकाली-भाजप युती म्हणजे ‘ठग्गजोड’ - मान

चंडीगड : अकाली दल आणि भाजपच्या पुन्हा झालेल्या युतीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘ठग्गजोड’ (फसवणूक करणाऱ्यांची युती) संबोधत जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. ‘त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही गाठजोड नसून ठग्गजोड आहे. पंजाबला पुन्हा लुटण्याच्या उद्देशाने ते एकत्र आले आहेत,’ असा आरोप मान यांनी केला.

२००७ ते २०१७ या काळात अकाली-भाजप युतीने दहा वर्षे राज्य केले. त्याच काळात पंजाबमध्ये अमली पदार्थांचा प्रसार झाला आणि २०१५ मध्ये बेअदबीच्या घटना घडल्या, असा आरोप मान यांनी केला. ‘कधी नख-मांसाचे नाते तोडतात, तर कधी पुन्हा जोडतात. पंजाब वाचवण्यासाठी युती केल्याचा दावा ते करत आहेत; मात्र ही युती पंजाबसाठी नसून कुटुंब वाचवण्यासाठी आहे,’ असे मान म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शतकमहोत्सवी संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

देवाभाऊंचा हा विरोध! धाडस की डावपेच?

आजचे राशिभविष्य, २५ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो? डॉक्टरांनी सांगितलं सत्य, मिठाबाबतचा 'हा' नियम लक्षात ठेवा

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर