राष्ट्रीय

आसामचे मुख्यमंत्री सर्वाधिक भ्रष्ट - राहुल गांधी; मोदी, शहा, सरमा यांचे आसाममध्ये लँड एटीएम, काँग्रेसची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Swapnil S

बोकाजन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. सरमा हे भारतातील ‘सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री’ असल्याचा आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री सरमा हे तिघे मिळून आसाममध्ये ‘लँड एटीएम’ चालवत असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला. सर्वसामान्यांच्या जमिनी हिसकावून त्या बड्या कॉर्पोरेट घराण्यांना दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बोकाजन मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रतन एंगती यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

‘लँड एटीएम’द्वारे जमिनींची लूट

राहुल गांधी यांनी दावा केला की, आसाममधील जवळपास ६१ हजार एकर जमीन तीन मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्यात आली आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि हिमंत बिस्वा सरमा यांनी आसामला जमिनीचे एटीएम बनवले आहे. जनतेकडून जमीन हिसकावून ती उद्योगपतींना वाटली जात आहे, असे ते म्हणाले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे सरमा हे पूर्णपणे मोदींच्या नियंत्रणाखाली असून ते सिंडिकेटद्वारे राज्य चालवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गर्ग यांच्या मृत्यूची चौकशी

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूर येथे बुडून मृत्यू झालेले प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचा उल्लेख करत राहुल गांधी भावूक झाले. ते म्हणाले, जुबीन गर्ग हे आसामच्या बहुसांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक होते. काँग्रेस सत्तेवर आल्यास १०० दिवसांच्या आत त्यांच्या मृत्यूचा तपास करून त्यांच्या कुटुंबाला न्याय दिला जाईल, याची मी १०० टक्के खात्री देतो.

विकेंद्रीकरण, आदिवासींचे हक्क

भाजप दिल्लीतून आसामवर राज्य करू पाहत असल्याचा आरोप करत गांधी यांनी काँग्रेसच्या विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यघटनेतील कलम २४४(अ) ची पूर्ण अंमलबजावणी केली जाईल. कार्बी आंगलाँग आणि सहाव्या अनुसूचीतील क्षेत्रांचे शासन गुवाहाटी किंवा दिल्लीतून नाही, तर स्थानिक लोकांद्वारे चालवले जाईल.आसाम हे विविध फुलांच्या गुच्छाप्रमाणे आहे, जेथे विविध विचारधारा आणि जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. हा वारसा काँग्रेस जपेल.

भारत-अमेरिका व्यापार करारावर टीकास्त्र

मोदींवर टीका करताना राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, या करारामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकन वस्तूंवरील कर कमी करून भारतीय बाजारपेठ त्यांच्यासाठी खुली करण्यात आली आहे. ‘एपस्टीन फाइल्स’मुळे डोनाल्ड ट्रम्प मोदींना नियंत्रित करत आहेत. ट्रम्प यांच्याकडे अदानींचे सर्व रेकॉर्ड असून त्यांनी अमेरिकेत अदानींविरुद्ध गुन्हेगारी गुन्हेही दाखल केले आहेत, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसची पाच आश्वासने

आसाममध्ये सत्तांतर घडवण्यासाठी काँग्रेसने पाच मुख्य आश्वासने दिली आहेत: प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात विनाअट मासिक रक्कम जमा करणार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी ५०,००० रुपयांची अतिरिक्त मदत, प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांचा कॅशलेस आरोग्य विमा, १० लाख भूमिपुत्रांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देणार, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १,२५० रुपये पेन्शन आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग आणि १०० दिवसांत गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाचा निकाल लावणार अशी पाच आश्वासने काँग्रेसने दिली आहेत.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी