किशनगंज : भाजप निवडणुकीच्या मैदानात नाही, तर 'मतं चोरून जिंकण्याचे राजकारण' करत आहे. माझ्या आरोपांवर ना पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली ना निवडणूक आयोगाने, त्यामुळे 'आम्ही जे म्हटले, ते पूर्णपणे खरे आहे,' असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
खासदार राहुल गांधी यांनी बिहारच्या किशनगंज येथील प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, 'तुम्ही हरयाणातले माझे 'हायड्रोजन बॉम्ब' भाषण पाहिलंत का? मी म्हटले होते की, 'मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त मिळून मते चोरत आहेत. आजवर कोणीही याचे उत्तर दिलेले नाही. मोदीजींनी एकदाही असे म्हटले नाही की, मी खोटं बोलतो किंवा मतचोरी करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की सत्य हेच आहे.'
राहुल गांधी म्हणाले की, भाजपचे नेते एकाहून अधिक राज्यांमध्ये मतदान करत आहेत आणि 'मोदी-शहा मते चोरून निवडणुका जिंकतात.' या लोकांनी आधी हरयाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात असे केले, आता बिहारमध्येही तेच करण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप त्यांनी केला.
गांधी म्हणाले की, आज देशात दोन विचारसरणींची लढाई सुरू आहे, एका बाजूला स्वयंसेवक आणि भाजप, जे जात, धर्म आणि भाषेच्या नावावर द्वेष पसरवतात आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस महागठबंधन, जे देश एकत्र आणण्याचं काम करतं.
त्यांनी पुढं म्हटले, 'मी ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला, जेणेकरून द्वेषाच्या बाजारात प्रेमाची दुकान उघडता येईल. मोदीजींच्या रक्तात द्वेष आहे, तर माझ्या रक्तात प्रेम आहे. आम्ही लोकांना जोडतो, ते लोकांना फोडतात'.
तरुणांशी संवाद साधताना गांधी म्हणाले की, रोजगार, शिक्षण आणि विकास यांसारख्या खऱ्या मुद्द्यांपासून लोकांचं लक्ष वळवलं जात आहे. त्यांनी म्हटले की, 'पंतप्रधान मोदी युवकांना सांगतात की डेटा स्वस्त केला आहे, आता रील बनवा. पण रील बनवून रोजगार मिळणार आहे का? इंस्टाग्राम, फेसबुक आणि रील्स हे २१व्या शतकाचे व्यसन आहे. यातून पैसा अदाणी-अंबानी कमावतात, युवक नाहीत, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी म्हणाले की, बिहारचे लोक देशभर आणि परदेशात कष्ट करून नाव कमावत आहेत, तरीही बिहार विकासापासून वंचित आहे. 'जेव्हा बिहारचे लोक दुबई आणि बेंगळुरूसारखी शहरे उभारू शकतात, तर बिहारमध्ये असे का नाही करू शकत? नालंदा विद्यापीठ कधी जगाचा अभिमान होते आणि आज तिथे पेपर लीक आणि सेटिंगच्या बातम्या येतात,' असे ते म्हणाले.
गांधी म्हणाले की, महागठबंधनाचे सरकार सगळ्यांचे असेल. शेतकरी, कामगार, मागासवर्गीय आणि युवकांचे. आम्ही द्वेष पसरवत नाही, प्रेमाचं राजकारण करतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.