राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; एकमेकांवर आदळल्या ५ गाड्या, १ रुग्णवाहिका (Photo-X)
राष्ट्रीय

राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; एकमेकांवर आदळल्या ५ गाड्या, १ रुग्णवाहिका

राहुल गांधी यांच्या ताफ्याच्या पुढील बाजूला स्थानिक काँग्रेस नेत्याचे खासगी वाहन होते. या वाहनाच्या चालकाने अज्ञात कारणामुळे अचानक ब्रेक लावला. त्यामुळे...

किशोरी घायवट-उबाळे

लखनऊ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांचा उत्तर प्रदेशातील पूर्वांचल द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि. २६) अपघात झाला. मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सुलतानपूरला जात असताना ही दुर्घटना घडली. एका खासगी वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी पाच वाहने आणि एका रुग्णवाहिकेची जोरदार धडक झाली. या अपघातात राहुल गांधी सुरक्षित असून काँग्रेस कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी आणि सुरक्षारक्षकांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

अचानक ब्रेक लावल्याने वाहनांची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील ९१ किलोमीटरच्या टप्प्याजवळ हा अपघात झाला. राहुल गांधी यांच्या ताफ्याच्या पुढील बाजूला स्थानिक काँग्रेस नेत्याचे खासगी वाहन होते. या वाहनाच्या चालकाने अज्ञात कारणामुळे अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून वेगाने येणाऱ्या वाहनांना नियंत्रण मिळवता आले नाही आणि पाच वाहने व एका रुग्णवाहिकेची एकमेकांना धडक बसली.

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून, त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी आणि राहुल गांधी यांच्या ताफ्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी ताफ्यासोबत पोलिस कर्मचारीही तैनात होते. अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

न्यायालयीन सुनावणीसाठी सुलतानपूरला जात होते राहुल गांधी

राहुल गांधी यांना २०१८ मधील फौजदारी मानहानीच्या खटल्याच्या निकालासाठी सुलतानपूर येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयात हजर राहायचे होते. या सुनावणीसाठी त्यांचा ताफा सकाळी सुमारे ११.१५ वाजता न्यायालयात पोहोचणे अपेक्षित होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

राहुल गांधी सोमवारी सकाळी लखनऊ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक पक्षनेते विमानतळावर जमले होते. मात्र, सुलतानपूरकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही.

अमित शहा यांच्यावरील वक्तव्यामुळे मानहानीचा खटला

राहुल गांधी यांच्याविरोधातील हा खटला मे २०१८ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित आहे. त्या वेळी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

या प्रकरणातील वकील ॲड. काशी प्रसाद शुक्ला यांनी सोमवारी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी अमित शहा यांचा उल्लेख एका खून प्रकरणातील आरोपी असा केला होता. त्यानंतर सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

या खटल्याचा निकाल जाहीर करण्यासाठी न्यायालयाने सुरुवातीला १३ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र, त्यानंतर निकालासाठी २६ ऑक्टोबर ही नवी तारीख देण्यात आली. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सुलतानपूरला जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकली; प्रवासी संतप्त, रुळांवरून पायपीट

प्रेमविवाहावरून येवल्यात लग्नमंडपात मोठा राडा; नवरदेवाच्या अंगावर डिझेल टाकण्याचा प्रयत्न? दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी

आरएमसी मिक्सरने नवविवाहितेचे दोन्ही पाय चिरडले; मिरा-भाईंदरमध्ये भीषण अपघात

Washim : 'कॉल रेकॉर्डिंग घरच्यांना ऐकवेन...' धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर गंभीर प्रकार उघड

राष्ट्रवादीला अर्थखाते? फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता