नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर भारतातील शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आणि तडजोड न होण्यासारख्या आहेत, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या मागण्यांमध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचाही समावेश आहे.
आंदोलन करणारे विद्यार्थी दहशतवादी नाहीत; ते फक्त सुरळीत आणि न्याय्य शिक्षणव्यवस्थेची मागणी करत आहेत, असे सांगतानाच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवरील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला उत्तरदायी धरावे, या मागण्यांचेही समर्थन केले.
येथील एआयसीसी मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, आपली शिक्षणव्यवस्था केवळ भ्रष्टच नाही, तर ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर (महागडी) झाली आहे. विद्यार्थ्यांशी पूर्ण सहमत विद्यार्थी आंदोलन करण्याचे दुसरे कारण म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना सांगितले जाते की, त्यांच्यासाठी उघडलेली रोजगाराची दारे आता बंद झाली आहेत.त्यामुळे उत्पादन (मैन्युफॅक्चरिंग) बंद आहे, उद्योजकता बंद आहे, कॉर्पोरेट नोकऱ्या बंद आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रही बंद आहे. त्यांच्याकडे सरकारी नोकरी हाच एकमेव पर्याय उरतो, पण तेथेही तुम्ही यंत्रणा भ्रष्ट करता आणि ती महागडी बनवता. आम्ही विद्यार्थ्यांशी १०० टक्के सहमत आहोत आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.