राष्ट्रीय

सोशल मीडियावर २ मिलियन फॉलोअर्स, पण निवडणुकीत मिळाली अवघी ३३ मतं; निकाल पाहून ज्योतिषाला धक्का

राजस्थानमधील प्रसिद्ध ज्योतिषी आणि यूट्यूबर ओमप्रकाश बिश्नोई याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र, सरपंचपदाच्या निवडणुकीत त्याला अवघी ३३ मतं मिळाली. या निकालाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Mayuri Gawade

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद आणि लोकांमध्ये मोठी ओळख! पण एवढी लोकप्रियता निवडणुकीत मतं मिळवून देईलच असं नाही. राजस्थानमधील एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेला ज्योतिषी आणि यूट्यूबर ओमप्रकाश बिश्नोई याने आपल्या गावातून सरपंचपदाची निवडणूक लढवली. मात्र, सुमारे १,६०० मतदार असलेल्या गावात त्याला अवघी ३३ मतं मिळाली. या अनपेक्षित निकालामुळे त्याचा पराभव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

लाखो फॉलोअर्स, तरीही मतदारांचा पाठिंबा नाही!

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ओसियां तालुक्यातील इंदों की ढाणी-२ ग्रामपंचायतीतून बिश्नोई निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. इन्स्टाग्रामवर त्याचे १४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर २ लाख ३२ हजार फॉलोअर्स, तर यूट्यूबवर सुमारे साडेपाच लाख सबस्क्रायबर्स आहेत. बिश्नोई स्थानिक गोशाळेचा अध्यक्षही आहे. स्वतःच्या गावातून निवडणूक लढवत असल्याने मतदारांचा चांगला पाठिंबा मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष निकालात त्याच्या वाट्याला निराशाच आली.

विशेष म्हणजे, एनडीटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत बिश्नोई याने मिळालेल्या ३३ मतांपैकी ११ मतं आपल्या कुटुंबीयांची असल्याचं सांगितलं. गावातील लोकांनी निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्ष मतदानात अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या निकालानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःच्या निवडणुकीतील पराभवाचा अंदाज आला नाही, अशा उपरोधिक प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी दिल्या.

या निकालामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष मतदारांचा पाठिंबा या दोन वेगळ्या गोष्टी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लाखो फॉलोअर्स असले, तरी ते सर्व संबंधित मतदारसंघातील मतदार असतीलच असं नाही. स्थानिक प्रश्न, गावकऱ्यांशी संपर्क आणि मतदारांचा विश्वास या गोष्टी निवडणुकीत महत्त्वाच्या ठरतात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?

मीरा-भाईंदरमध्ये पाण्यासाठी हाहाकार; MIDC कडून १५ टक्के पाणी कपात

ब्रेडमध्ये केवळ ६२ टक्के गव्हाचा वापर; CCPA चा ब्रिटानियाला लाखाचा दंड

तानसा, कोलामार्काला राखीव अभयारण्याचा दर्जा; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास वन्य जीव मंडळाची मान्यता

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना बंदी; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी