प्रजासत्ताकदिनापूर्वी घातपाताचा कट? १० टन स्फोटके जप्त  Photo : X
राष्ट्रीय

प्रजासत्ताकदिनापूर्वी घातपाताचा कट? १० टन स्फोटके जप्त

देशभरात प्रजासत्ताकदिनाचा उत्साह असतानाच, राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या घातपाताचा कट उधळून लावला आहे. नागौर जिल्हा पोलीस आणि जिल्हा विशेष पथकाने शनिवारी उशिरा रात्री हरसौर गावातील एका फार्म हाऊसवर धाड टाकून तब्बल १० हजार किलो अवैध अमोनियम नाइट्रेट जप्त केले आहे.

Swapnil S

नागौर : देशभरात प्रजासत्ताकदिनाचा उत्साह असतानाच, राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या घातपाताचा कट उधळून लावला आहे. नागौर जिल्हा पोलीस आणि जिल्हा विशेष पथकाने शनिवारी उशिरा रात्री हरसौर गावातील एका फार्म हाऊसवर धाड टाकून तब्बल १० हजार किलो अवैध अमोनियम नाइट्रेट जप्त केले आहे. राजस्थानमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. फार्म हाऊसमध्ये साठा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मृदुल कच्छावा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. सुलेमान खान नावाच्या आरोपीने आपल्या शेतात असलेल्या एका घरात १८७ पोत्यांमध्ये हे अमोनियम नाइट्रेट लपवून ठेवले होते. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून ९ कार्टन डेटोनेटर, १२ कार्टन आणि १५ बंडल निळी फ्युज वायर, तसेच १२ कार्टन आणि ५ बंडल लाल फ्युज वायर असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

लाल किल्ला स्फोटाशी धागेदोरे?

जप्त करण्यात आलेले अमोनियम नाइट्रेट हे अत्यंत घातक रसायन असून, यापूर्वी अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये याचा वापर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटातही अमोनियम नाइट्रेटचा वापर झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे या साठ्याचा संबंध एखाद्या मोठ्या कटाशी आहे का, याचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणा करणार आहेत.

आरोपी अटकेत

याप्रकरणी पोलिसांनी हरसौर येथील रहिवासी सुलेमान खान याला अटक केली आहे. सुलेमान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही स्फोटक कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक चौकशीत त्याने हा स्फोटकांचा साठा कायदेशीर आणि बेकायदेशीर खाणकामासाठी पुरवण्यासाठी ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके साठवून ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

तपास यंत्रणा हाय अलर्टवर नागौर पोलिसांनी या जप्तीची माहिती तातडीने केंद्रीय तपास यंत्रणांना दिली आहे. संघटित गुन्हेगारी आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत आणि लवकरच यामागचे मुख्य सूत्रधार समोर येतील, असे पोलीस अधीक्षक मृदुल कच्छावा यांनी सांगितले.

उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरण : सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात सुनेचा छळ; दीप्तीसोबत नेमकं काय झालं? आईने केला खुलासा

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

तिजोरीत खडखडाट, विविध कामांचा आराखडा कागदावरच; महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आरोप