नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर सांस्कृतिक विविधता, आर्थिक प्रगती आणि लष्करी सामर्थ्याचे भव्य प्रदर्शन भारताने सादर केले.
या कर्तव्य पथकावर मुख्य संचलन पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. राष्ट्रगीतानंतर २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी युरोपियन नेत्यांसह आणि राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या ताफ्यासोबत पारंपरिक बग्गीतून कर्तव्य पथावर आगमन केल्यानंतर थोड्याच वेळात संचलनाची मानवंदना स्वीकारत संचलनाला सुरुवात झाली. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रथमच युरोपीय परिषद अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन हे दोन प्रमुख पाहुणे सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. ९० मिनिटांच्या परेडमध्ये विविध राज्ये आणि मंत्रालयांच्या ३० चित्ररथ सादर करण्यात आले.
कर्तव्य पथावर पार पाडलेल्या परेडमध्ये तीनही सैन्य दलांनी आपली ताकद दाखवली. हवाई दलाचे राफेल, जग्वार, मिग-२९, सुखोई यांसह २९ विमाने सहभागी झाली. या विमानांनी ‘सिंदूर’, ‘वज्रांग’, ‘अर्जुन’ आणि ‘प्रहार’ अशा विविध फॉर्मेशन्स साकारल्या.
क्षेपणास्त्र, बॅटल एअरक्राफ्ट, नव्या तुकडया तसेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान वापरलेल्या घातक शस्त्रप्रणालींचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये ब्रह्मोस आणि आकाश यंत्रणा, सूर्यास्त्र रॉकेट लाँचर, अर्जुन मुख्य रणगाडा, तसेच स्वदेशी लष्करी शस्त्रास्त्रे आदींचा समावेश होता.
फ्लाय-पास्टदरम्यान सुखोई, सी-२९५ सह २९ विमानांनी वरुण, अर्जन आणि सिंदूर फॉर्मेशन साकारले. या सर्व विमानांनी चंदीगड येथून उड्डाण घेतले. ‘वज्रांग’ फॉर्मेशनमध्ये ६ राफेल विमाने दिसली. ‘सी-२९५’ विमानांच्या माध्यमातून ‘अर्जुन’ फॉर्मेशन तयार करण्यात आले.
हवाई दलाच्या दोन राफेल, दोन सुखोई, दोन मिग-२९ आणि एक जग्वार लढाऊ विमानांनी ‘सिंदूर’ फॉर्मेशन तयार केले. ही रचना केवळ एअरोडायनॅमिक्सवर आधारित नसून भावना, परंपरा आणि संदेश लक्षात घेऊन निश्चित करण्यात आली होती. आकाशात ही फॉर्मेशन सिंदूराची रेषा असल्यासारखी भासत होती.
‘वंदे भारत’ संकल्पनेवर कार्यक्रम
यंदा ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना त्या आधारवर होती.
‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवर आधारित सुमारे १०० कलाकारांनी विविध वाद्यांच्या भव्य सादरीकरणातून संचलनाची नांदी केली, ज्यातून देशाची एकता आणि समृद्ध सांस्कृतिक विविधता अधोरेखित झाली.
मे महिन्याच्या सुरुवातीला राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय लष्कराने तैनात केलेल्या प्रमुख शस्त्रप्रणालींच्या प्रतिकृती दाखविणारे त्रिसेवा (थल, नौ, वायु) दलांचे चित्ररथ हे संचलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
काचेत बंदिस्त एकात्मिक ऑपरेशनल केंद्राचा चित्ररथ कर्तव्य पथावरून पुढे सरकला. यात ब्रह्मोस आणि एस-४०० क्षेपणास्त्रांसारख्या प्रणालींच्या साहाय्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ कसे राबविले गेले याचे चित्रण करण्यात आले.
हवाई पाठबळासाठी स्वदेशी ‘ध्रुव’ अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर आणि त्याचे सशस्त्र रूप ‘रुद्र’ प्रहार फॉर्मेशनमध्ये दाखविण्यात आले, ज्यातून रणांगणाच्या तयारीचे प्रात्यक्षिक सादर झाले.
यानंतर ‘टी-९०’ भीष्म रणगाडे आणि मुख्य रणगाडा अर्जुन हे ही संचालनात सहभागी झाले होते. ‘अपाचे एएच-६४ई’ आणि ‘प्रचंड’ हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्सचे त्यांना हवाई पाठबळ होते. इतर यांत्रिक तुकड्यांमध्ये बीएमपी-२ इन्फन्ट्री कॉम्बॅट व्हेईकल आणि ‘नाग’ क्षेपणास्त्र प्रणाली (ट्रॅक्ड) एमके-२ यांचा समावेश होता.
युरोपियन युनियनचा एक लष्करी ताफा, ‘ऑपरेशन अटलांटा’ आणि ‘ऑपरेशन अस्पिडेस’ यांचे ध्वज घेऊन संचलनात सहभागी झाले. युरोपबाहेर अशा प्रकारच्या कार्यक्रमात युरोपियन युनियन पहिल्यांदाच सहभागी झाला.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात १४४ तरुण जवान होते. या ताफ्याचे नेतृत्व लेफ्टनंट करन नाग्याल यांनी केले. तर लेफ्टनंट पवन कुमार गांधी, लेफ्टनंट प्रीती कुमारी आणि लेफ्टनंट वरुण द्रेवेरिया हे पलटण कमांडर होते. नौदलाचा चित्ररथ आला, ज्याची संकल्पना ‘मजबूत राष्ट्रासाठी मजबूत नौदल’ अशी होती. यात पाचव्या शतकातील शिवलेल्या जहाजाचे (आता आयएनएसव्ही कौंडिण्य) रूप, मराठा नौदलाची गुराब वर्गातील जहाजे तसेच स्वदेशी अग्रिम प्लॅटफॉर्म्स विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी यांचे दर्शन घडविण्यात आले.
या चित्ररथात ‘नाविका सागर परिक्रमा–२’ मोहिमेअंतर्गत आयएनएसव्ही तारिणीने पूर्ण केलेल्या समुद्रप्रदक्षिणा मार्गाचेही चित्रण होते. नौदलाच्या जवानांसोबतच मुंबईतील युवकांना मूलभूत नौकानयन कौशल्ये देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या ‘सी कॅडेट्स कॉर्प्स’चे तरुण कॅडेट्सही सहभागी झाले.
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात चार अधिकारी आणि १४४ हवाई सैनिक होते. स्क्वॉड्रन लीडर जगदीश कुमार हे ताफा कमांडर होते, तर स्क्वॉड्रन लीडर निकिता चौधरी, फ्लाइट लेफ्टनंट प्रखर चंद्राकर आणि फ्लाइट लेफ्टनंट दिनेश हे अतिरिक्त अधिकारी होते.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ)ने आपली हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र प्रणाली एलआर-एएसएचएम सादर केली. स्थिर तसेच गतिमान लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र विविध पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथमच स्वदेशी एव्हिऑनिक्स प्रणाली आणि उच्च अचूकतेचे सेन्सर पॅकेजेस वापरण्यात आले आहेत.
परेडमध्ये ३० राज्यांचे चित्ररथ
देशभरातील विविध राज्ये आणि मंत्रालयांच्या ३० हून अधिक चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. यात २५०० कलाकारांनी सहभाग घेतला. १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे आणि १३ विविध मंत्रालये व विभागांचे. या चित्ररथांमधून ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा गौरव आणि देशाची जलद प्रगती यांचे अनोखे मिश्रण सादर करण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांच्या संयुक्त ‘डेअरडेव्हिल्स’ मोटरसायकल पथकाने आपल्या कसरतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
चित्ररथात महाराष्ट्रातला गणेशोत्सव सादर
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राने आधुनिकता आणि परंपरेचा संगम सादर करत आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून गणेशोत्सवाचे दर्शन घडवले. या चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला नर्तकांनी लोकनृत्य ‘लेझीम’ सादर केले. या चित्ररथातून व्यक्त होणारी आत्मनिर्भरता आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक अशा विविध अंगांना स्पर्श करणारी आहे. चित्ररथाच्या अग्रभागी गणेशोत्सवाशी निगडित पारंपरिक ढोल वाजवताना एका महिलेचे भव्य दृश्य साकारण्यात आले आहे. चित्ररथाच्या मागील भागात गणपती बाप्पांची मूर्ती साकारताना एक शिल्पकार दाखवण्यात आला आहे. मध्यभागात गणेशभक्त डोक्यावर गणेशमूर्ती घेऊन विसर्जनासाठी जात असल्याचे दृश्य आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे (गणपतीच्या आठ पवित्र तीर्थस्थळांचे) प्रतीकात्मक मंदिर दाखवण्यात आले आहे.
अमेरिका-भारत ऐतिहासिक नाते - ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताचे अभिनंदन करताना म्हटले की, जगातील सर्वात जुनी आणि मोठी लोकशाही असलेल्या अमेरिका आणि भारत यांच्यात ऐतिहासिक नाते आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संबंध सध्या व्यापार व टॅरिफच्या धोरणावरून तणावग्रस्त झाले आहेत. त्याचवेळी ट्रम्प यांचा शुभेच्छा संदेश आला आहे.