राष्ट्रीय

दिल्लीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला अटक; लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याचा आरोप

अटक झालेल्या आरोपीचे नाव रियाझ अहमद राठेर असून तो कुपवारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीरच्या कुपवारा येथे दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी मंगळवारी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्यास अटक केली. अटक झालेला दहशतवादी हा निवृत्त लष्करी अधिकारी असून त्याने नियंत्रणरेषेपलीकडून शस्त्र व दारुगोळा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अटक झालेल्या आरोपीचे नाव रियाझ अहमद राठेर असून तो कुपवारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकात रविवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर खुर्शीद अहमद राठेर आणि गुलाम सरवार राठेर यांच्यासोबत नियंत्रणरेषेपलीकडून शस्त्रे व दारुगोळा आणण्याचा कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच जम्मू-काश्मीरमध्ये एक दहशतवादी गट सुरक्षा दलांनी उद‌्ध्वस्त केला होता, ज्यात पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तसेच पाच एके रायफल्स, पाच एके मॅगझिन आणि एके रायफलच्या १६ फैरी देखील जप्त करण्यात आल्या होत्या. त्याच प्रकरणात रियाझ अहमद राठेर हा सुरक्षा दलांना हवा होता. तपास यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर रविवारी या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेला माल पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमधील एलर्इटी दहशतवादी मंझूर अहमद शेख उर्फ शकूर राहणार गब्रा कर्नाह आणि काझी मोहम्मद खुशाल (रा. धन्नी कर्नाह) यांच्याकडून पाठवण्यात आला होता. हे दोघेही सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करीत होते. रियाझ रविवारी पहाटे नवी दिल्ली रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती तपास यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार नवी दिल्ली रेल्वे ठाण्याचे एक पथक रेल्वे स्थानकात दबा धरून बसले होते. त्यांनी रियाझची ओळख पटवून त्याला त्वरित अटक केली. तो गेट नंबर १ मधून पसार होण्याच्या प्रयत्नात होता, पण पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. मिळालेल्या माहितीनुसार, रियाझ व त्याचा मित्र अल्ताफ हे जबलपूरहून महाकौशल एक्स्प्रेसने शनिवारी दुपारी ३ वाजता हजरत निझामुद्दीन रेल्वे स्थानकात पोहोचले होते. तेथून ऑटोरिक्षा करून ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले होते. येथून रियाझ अन्य एखाद्या अज्ञात स्थळी पळण्याच्या तयारीत होता.

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद