तंत्रज्ञानाच्या युगात रोज काही ना काही नवं आणि आश्चर्यकारक पाहायला मिळत आहे. रोबोट्स केवळ स्वयंपाक, सेवा किंवा औद्योगिक कामांपुरते मर्यादित राहिले नसून, आता ते थेट स्टेजवर परफॉर्म करतानाही दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोबोट्स माणसांप्रमाणे स्टेजवर भन्नाट डान्स करताना आणि अवघड फ्लिप्स मारताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ चिनी-अमेरिकन गायक वाँग लीहोम यांच्या चीनमधील एका कॉन्सर्टमधील आहे. स्टेजवर सुरू असलेल्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान अनेक मानवी डान्सर्ससोबत काही रोबोट्सही डान्स करताना दिसतात. विशेष म्हणजे हे रोबोट्स केवळ साध्या स्टेप्सच नव्हे, तर वेबस्टर फ्लिप्ससारखे अत्यंत अवघड डान्स मूव्ह्सही सहजतेने सादर करताना दिसत आहेत. त्यांच्या अचूक हालचाली आणि समन्वय पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले.
एलन मस्क यांची ‘एक शब्दात’ प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर @rohanpaul_ai या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "चीनमध्ये आता रोबोट्स सर्व काही करत आहेत. स्टेजवर प्रोफेशनल डान्सर्सप्रमाणे डान्स करत वेबस्टर फ्लिप्सही करताना पाहायला मिळाले. चेंगदूतील वाँग लीहोम यांच्या कॉन्सर्टमधील हा परफॉर्मन्स आहे."
या व्हिडिओवर टेस्लाचे सीईओ आणि जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या पोस्टवर केवळ "Impressive" असा एक शब्द लिहून प्रतिक्रिया दिली असून, मस्क यांचा हा संक्षिप्त प्रतिसाद सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
५० लाखांहून अधिक व्ह्यूज, मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस
अवघ्या ४० सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ५० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, हजारो युजर्सनी त्याला लाईक्स आणि शेअर्स दिले आहेत. अनेकांनी "आता रोबोट्सही टॅलेंटेड झाले आहेत" अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर काहींनी "भविष्यात डान्स शोमध्ये माणसांऐवजी रोबोट्सच दिसतील का?" अशी गंमतीशीर चिंता व्यक्त केली आहे. काही युजर्सनी तर "हे रोबोट्स लग्नसमारंभ किंवा पार्ट्यांसाठी बुकिंगला मिळतील का?" असा सवालही उपस्थित केला आहे.