Photo : X (Rajnath Singh)
राष्ट्रीय

स्वदेशी ‘समुद्र प्रताप’ रोखणार समुद्राचे प्रदूषण; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण

भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) पहिल्या स्वदेशी रचनेच्या आणि निर्मितीच्या प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी गोव्यात केले.

Swapnil S

पणजी : भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) पहिल्या स्वदेशी रचनेच्या आणि निर्मितीच्या प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी गोव्यात केले.

११४.५ मीटर लांबीचे हे जहाज ‘गोवा शिपयार्ड लिमिटेड’ (जीएसएल) येथे बांधण्यात आले असून त्यामध्ये ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर केला आहे. ४,२०० टन वजनाच्या या जहाजाचा वेग २२ नॉट्सपेक्षा अधिक असून ६ हजार सागरी मैलांची ‘एन्ड्युरन्स’ त्याला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘समुद्र प्रताप’ हे सागरी प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी, सागरी कायदा अंमलबजावणी, शोध व बचाव मोहिमा तसेच भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. भारतात तयार झालेले हे सर्वात मोठे आणि अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण जहाज असून स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर सागरी भवितव्याच्या दिशेने देशाच्या दीर्घकालीन दृष्टीचे ते प्रतीक आहे, असे ‘आयसीजी’ने म्हटले आहे.

हे जहाज डिसेंबरमध्ये औपचारिकरीत्या तटरक्षक दलाला सुपूर्द केले होते. सोमवारी वास्को येथे संरक्षण मंत्री सिंह यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि ‘आयसीजी’चे महासंचालक परमेश शिवमणी उपस्थित होते.

सिंह म्हणाले की, हा क्षण भारताच्या व्यापक सागरी दृष्टीशी जोडलेला आहे. सागरी संसाधने कोणत्याही एका देशाची मालमत्ता नसून ती मानवजातीचा सामायिक वारसा आहेत. वारसा सामायिक असेल तर जबाबदारीही सामायिक असते. म्हणूनच भारत आज एक जबाबदार सागरी शक्ती म्हणून पुढे आला आहे, असे ते म्हणाले.

समुद्र प्रताप हे भारतातील पहिले स्वदेशी रचनेचे प्रदूषण नियंत्रण जहाज असून आजपर्यंत तटरक्षक दलाच्या ताफ्यातील हे सर्वात मोठे जहाज आहे. यात ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर झाला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक भक्कम पाऊल आहे. ‘मेक इन इंडिया’चा खरा अर्थ अशा प्रकल्पांतून दिसून येतो,’ असे ते म्हणाले.

अलीकडच्या काळात सागरी प्रदूषण हे गंभीर आव्हान म्हणून उभे राहत असल्याकडे लक्ष वेधत सिंह म्हणाले, ‘सागरी प्रदूषण वाढल्यास मच्छीमारांची उपजीविका, किनारपट्टीवरील समुदायांचे भविष्य आणि पुढील पिढ्यांची सुरक्षितता यावर परिणाम होतो.’

तटरक्षक दलात महिलांचा सहभाग वाढला

तटरक्षक दलाने महिला सक्षमीकरणाला योग्य महत्त्व दिले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले. पायलट, निरीक्षक, हवाई वाहतूक नियंत्रक आणि लॉजिस्टिक्स अधिकारी अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना व्हॉव्हरक्राफ्ट संचालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. आज महिला केवळ सहाय्यक भूमिकेत नसून उच्च पदावरील योद्धाप्रमाणे कार्यरत आहेत, असे त्या म्हणाल्या.

जहाजाची वैशिष्ट्ये

  • लांबी - ११४.५ मीटर

  • रुंदी - १६.५ मीटर

  • वजन - ४२०० टन

  • वेग - ताशी २२ नॉटिकल नॉट‌्स‌

  • ३० मिमी सीआरएन - ९१ तोफ

  • आधुनिक अग्निशमन यंत्रणा कर्मचारी - १४ अधिकारी, ११५ कर्मचारी

भिवंडीत १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित; शहरातील २१ टक्के मतदान केंद्र संवेदनशील, पोलिसांनी विशेष खबरदारी वाढवली

Thane Election : ठाण्यात १७६ मतदान केंद्र संवेदनशील; निवडणूक शांततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध उमेदवारांची घोषणा; राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची माहिती

Thane Election : ठाण्यात रंगले 'बॅनर' युद्ध; सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; विकास विरुद्ध असंतोष

आयआयटी मुंबईत 'परमरुद्र' सुपरकॉम्प्युटर कार्यान्वित; सी-डॅकच्या माध्यमातून उभारणी; प्रगत संगणकीय संशोधनासाठी होणार मदत