File Image
राष्ट्रीय

Sitaram Yechury: ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन

Swapnil S

दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्ली येथील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. श्वसनमार्गात संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेले अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे़ दरम्यान, त्यांचा मृतदेह कुटुंबीयांनी एम्स रुग्णालयाला अभ्यास व संशोधनासाठी दान केला आहे.

येचुरीयांच्या श्वसननलिकेला संसर्ग झाला होता़ बुधवारपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. येचुरी हे गेली ५० वर्षे भारतीय राजकारणात कार्यरत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील सर्वात ओळखीचा चेहरा अशी त्यांची प्रतिमा होती. माकपमधील एक प्रेमळ व समजूतदार नेता म्हणून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत असतानाच येचुरी यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. विद्यार्थीदशेत माकपमध्ये प्रवेश करणारे येचुरी २०१५ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख बनले. त्यांच्याच कारकीर्दीत गेल्या वर्षी त्यांच्या पक्षाने काँग्रेस व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. माकपने पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाशी युती केली होती़

चेन्नई येथे १९५२ मध्ये त्यांचा जन्म झाला. हैदराबाद येथील निझाम कॉलेजमध्ये शिकत असतानाच ते दिल्लीला आले. येथील सेंट स्टीफन कॉलेज आणि जेएनयू येथून त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. याचवेळी येचुरी यांची कम्युनिस्ट नेते प्रकाश करात यांच्याशी ओळख झाली.

येचुरी हे कम्युनिस्ट नेते सुरजित सिंग याचे शिष्य होते़ दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांचे इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही चांगले संबंध होते. भाजप सोडून त्यांनी इतर सर्व नेत्यांसोबत काम केले होते. २००४ मध्ये काँग्रेसप्रणित यूपीए सरकार सत्तेवर येण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

अमेरिकेसोबतच्या अणुकराराला दिले समर्थन

कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर बनलेल्या यूपीए सरकारच्या काळात भारत-अमेरिका यांच्यातील अणुकरार हा काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षांमध्ये कळीचा मुद्दा बनला होता़ येच्युरी यांचा अणुकराराला पाठिंबा होता़ कम्युनिस्ट पक्षाने या मुद्द्यावर यूपीए सरकारचा पाठिंबा काढू नये यासाठी येच्युरी यांनी त्यावेळचे पक्षाचे प्रमुख प्रकाश करात यांच्याकडे आग्रह धरला होता़

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीताराम येच्युरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘सीताराम येच्युरी माझे चांगले मित्र होते. ‘इंडिया’ या कल्पनेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. आमच्या होणाऱ्या प्रदीर्घ चर्चा माझ्या कायम स्मरणात राहतील’, असे त्यांनी म्हटले आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा