बंगळुरू : येत्या २०२८ ची विधानसभा निवडणूक आपण लढणार नाही, पण राजकारणात सक्रिय राहून जनतेचे प्रश्न मांडतच राहणार आहोत. सध्याचे राजकारण अत्यंत भ्रष्ट झाल्याची कबुली कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. मंड्या जिल्ह्यातील के. आर. पेट येथे शनिवारी पार पडलेल्या एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, आज राजकारण अत्यंत दूषित झाले आहे. याच कारणामुळे मी २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही. तरीही, मी राजकारणात सक्रिय राहीन आणि लोकांच्या अडीअडचणी अन् कल्याणासाठी सातत्याने आवाज उठवत राहीन,’
मैसूर येथील वरुणा मतदारसंघातील जनता त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची विनंती करत असल्याचे नमूद करत ते म्हणाले, ‘मी आता कोणतीही निवडणूक न लढवण्याचा नाही असा निर्णय घेतला आहे. पूर्वी जेव्हा मी निवडणूक लढवत असे, तेव्हा मतदारसंघातील जनता आम्हाला आर्थिक मदत करायचे आणि आमचा विजय सुनिश्चित करायचे. आज ती परिस्थिती राहिलेली नाही.
मी आता ७९ वर्षांचा आहे. आमच्या काँग्रेस सरकारचा कार्यकाळ आणखी दीड वर्ष शिल्लक आहे. तोपर्यंत माझे वय ८१-८२ वर्षे होईल. माझी प्रकृती आतासारखी उत्तम राहीलच असे नाही, आणि कदाचित पूर्वीसारख्या ऊर्जेने आणि उत्साहाने मला काम करता येणार नाही."
मी १९७८ मध्ये तालुका मंडळ सदस्य म्हणून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मी विजय आणि पराभव दोन्ही पाहिले आहेत, परंतु मी ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवला त्यांच्याविरुद्ध कधीही काम केले नाही किंवा माझ्या विवेकबुद्धीशी प्रतारणा केली नाही, याचे मला समाधान आहे,’ असे ते म्हणाले.
पाच दशकांपासून या राज्यातील जनतेने मला आपल्यातीलच एक मानले आहे आणि माझ्यावर प्रेम व पाठिंबा दर्शवला आहे. मी त्यांचा ऋणी राहीन. त्यामुळे मी माझे उर्वरित आयुष्य जनसेवेसाठी समर्पित करेन," असे त्यांनी शेवटी सांगितले.
यापूर्वी, २०२३ ची निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक असेल अशी घोषणा करत सिद्धरामय्या आपल्या ‘वरुणा’ या मतदारसंघात परतले होते आणि तिथून पुन्हा एकदा विजयी झाले होते. त्यानंतरही ही त्यांची शेवटची निवडणूक असू शकते, परंतु त्यानंतरही ते राजकारणात सक्रिय राहतील असे त्यांनी सांगितले होते.
आता जनतेलाच पैसे द्यावे लागतात
आता असा काळ आला आहे की, राजकारण्यांना निवडणूक लढवायची असेल तर जनतेला पैसे द्यावे लागतात. आजचे राजकारण अत्यंत भ्रष्ट झाले आहे. प्रामाणिक राजकारणाला टिकून राहण्यासाठी फारसा वाव उरलेला दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर मी भविष्यात कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.