SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार (Photo-X)
राष्ट्रीय

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

बंगळुरूतील आंदोलनापूर्वी CJP आणि ध्रुव राठीकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता...

किशोरी घायवट-उबाळे

बंगळुरू : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात CJP कडून बंगळुरूतील फ्रीडम पार्कमध्ये गुरुवारी (दि. ८) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात यूट्यूबर ध्रुव राठी सहभागी झाला. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके आणि अभिनेते-सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांच्यासोबत राठीने आंदोलनाच्या मंचावर उपस्थिती लावली. SIR प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार अभिजीत दिपके यांनी व्यक्त केला.

ध्रुव राठीचा CJP आंदोलनाला पाठिंबा

बंगळुरूतील आंदोलनापूर्वी CJP आणि ध्रुव राठीकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरसारख्या या व्हिडीओत अभिजीत दिपके यांनी, "मी बंगळुरूतील मोर्चासाठी आलो आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे," असे म्हणत कॅमेऱ्याच्या दिशेने पाहिले. त्यानंतर पाठमोरा बसलेला ध्रुव राठी कॅमेऱ्यासमोर आला.

"नमस्कार मित्रांनो, ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. ८ ऑक्टोबरला आपण बंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये भेटूया. जे दिल्लीत राहतात त्यांनी १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर यायला विसरू नका," असे आवाहन राठीने या व्हिडीओत केले होते.

त्यानंतर प्रकाश राज व्हिडीओमध्ये दिसले. त्यांनी 'सिंघम' चित्रपटाच्या शैलीत, "आली रे आली, ज्ञानू आता तुझी वेळ आली," असे म्हटले होते. या व्हिडीओनंतर राठीच्या बंगळुरूतील सहभागाची चर्चा सुरू झाली आणि गुरुवारी त्याने प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला.

SIR प्रक्रियेविरोधात CJP चे आंदोलन

मतदार याद्यांमधून कथितरीत्या चुकीच्या पद्धतीने नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत CJP कडून हे आंदोलन आयोजित करण्यात आले. कर्नाटकातील SIR प्रक्रियेमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आंदोलनाचे आयोजन 'जनन्यायाधिकरण' म्हणून करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

महिला, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. SIR प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

'ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत लढा सुरूच'

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला संबोधित करताना SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत त्यांनी ही प्रक्रिया भाजपविरोधी नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी राबवली जात असल्याचा दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर टीका करत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

'शून्य पारदर्शकता आणि शून्य उत्तरदायित्व'

ध्रुव राठीने आंदोलनाला संबोधित करत SIR प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगावर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रक्रियेत "शून्य पारदर्शकता आणि शून्य उत्तरदायित्व" आहे. आपण सत्तांतर घडवण्यासाठी आंदोलनात सहभागी झालो नसल्याचेही राठीने स्पष्ट केले.

प्रकाश राज यांचीही उपस्थिती

अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनीही आंदोलनाला संबोधित केले. SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत त्यांनी ही प्रक्रिया नागरिकांच्या अधिकारांवर परिणाम करणारी असल्याचा आरोप केला. ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोपही प्रकाश राज यांनी केला.

'साहेब राजीनामा द्या'

आंदोलनस्थळी विविध घोषणांचे फलक झळकावण्यात आले. "एरर ४०४ - नाव सापडले नाही", "साहेब राजीनामा द्या", "आमचे म्हणणे ऐका", "हुकूमशाही सहन केली जाणार नाही", "वोटचोरी" आणि "ज्ञानेश कुमार, खुर्ची सोडा" अशा घोषणा फलकांवर लिहिण्यात आल्या होत्या.

भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांची छायाचित्रे असलेले फलक तसेच "लोकशाहीची मोठी चोरी" अशी घोषणा असलेले फलकही आंदोलनस्थळी दिसून आले.

१० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन

बंगळुरूतील आंदोलनानंतर CJPकडून १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा पुढील टप्पा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अभिजीत दिपके आणि ध्रुव राठी यांनी केले आहे.

बंगळुरूतील आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीतील आंदोलनासाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न CJP कडून केला जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम

Thane : जांभळी नाक्यावर अतिक्रमणांचा भडका; महावितरणच्या डीपीभोवतीच बांधकामाचा विळखा

स्थगिती कालावधीत मराठी शिका; 'मराठी संवाद भाषा' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन