राष्ट्रीय

पहलगाम हल्ल्यातील ३ दहशतवाद्यांचा ऑपरेशन 'महादेव'मध्ये खात्मा; अमित शहांची लोकसभेत माहिती

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सोमवारी (दि.२८) तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समोर आलं होतं. या तिन्ही दहशतवाद्यांचा पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता, असे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि.२९) लोकसभेत स्पष्ट केलं.

नेहा जाधव - तांबे

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सोमवारी (दि.२८) तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समोर आलं होतं. या तिन्ही दहशतवाद्यांचा पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता, असे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि.२९) लोकसभेत स्पष्ट केलं.

लोकसभेत सोमवारपासून ऑपरेशन सिंदूरबाबत मॅरेथॉन चर्चा सुरू आहे. मंगळवारी याबाबत बोलताना शहा यांनी भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पहलगामच्या हल्लेखोरांना यमसदनी धाडल्याचं सांगितलं. तिघांची ओळख देखील पटल्याचं ते म्हणाले.

तिन्ही दहशतवादी लष्करशी संबंधित

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील हरवान परिसरात, दाचिगाम नॅशनल पार्कजवळ सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या तिघांची नावे सुलेमान उर्फ फैसल, अफगाण आणि जिब्रान अशी असून ते तिघेही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'शी संबधित होते. तर, हे तिघेही पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला जबाबदार होते, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

अमित शहा यांनी सांगितले, की ही मोहीम २२ मे पासून राबवण्यात आली. अनेक मार्गांनी या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. अखेर २२ जुलै रोजी लष्कराला सेन्सर्सच्या मदतीने दहशतवाद्यांची माहिती मिळाली. त्यानंतर दाचिगाम जंगलात सर्च ऑपरेशन्स राबवण्यात आले. अन् २८ जुलै रोजी या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

आसरा देणाऱ्यांनी पटवली ओळख

दहशतवाद्यांना अन्न आणि आश्रय पुरवणाऱ्या परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद या दोन स्थानिकांना NIA ने आधीच ताब्यात घेतले होतं. दहशतवाद्यांचे मृतदेह त्या दोघांना दाखवण्यात आले. जोथर आणि अहमद यांनी मृतदेहांची ओळख पटवली आणि ते दहशतवादीच असल्याचे स्पष्ट केले, असे शहा यांनी सांगितले.

तसेच FSL (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) अहवालाचा उल्लेख करत शहा यांनी सांगितले की, हल्ल्यात वापरलेली काडतुसे आणि आता जप्त करण्यात आलेल्या रायफल्स यांची तपासणी करण्यात आली. त्या दोघांमध्येही साम्य आढळले. त्यानंतर चंदीगडमध्ये अंतिम तपासणी करून हे तिघेही पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचे सिद्ध झाले.

गृहमंत्र्यांकडून जवानांचे अभिनंदन

अमित शहा म्हणाले, “मी भारतीय लष्कराचे जवान, सीआरपीएफ आणि जम्मू-कश्मीर पोलिसांचे आभार मानतो. त्यांनी ‘ऑपरेशन महादेव’मध्ये धाडसी कारवाई करत मोठं यश मिळवलं.”

पण, विरोधक समाधानी नाहीत - शहा

शहा यांनी यावेळी विरोधकांवर टीकाही केली. “दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची बातमी ऐकून विरोधक समाधानी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्याकडून यावर समाधान किंवा कौतुक दिसत नाही,” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

तमिळ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३३ जणांचा मृत्यू; ५० जखमी

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : दांडिया प्रेमींसाठी खुशखबर! शेवटचे ३ दिवस मध्यरात्रीपर्यंत खेळता येणार गरबा; पण 'हे' नियम पाळावे लागणार