नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांनी येत्या सोमवारी २० जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोमवारी संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.
वांगचुक यांची प्रकृती गंभीर
डॉ. सतीश लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणाला सुरुवात केल्यापासून सोनम वांगचुक यांचे वजन तब्बल ९ किलोपेक्षा जास्त घटले आहे. जर सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर वांगचुक यांचे ऑर्गन फेल होऊ शकतात, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या गंभीर इशाऱ्यांनंतरही सोनम वांगचुक मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत म्हटले आहे की, आम्ही हे आंदोलन एवढ्या लवकर संपवणार नाही.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांनी उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक तसेच विद्यार्थी नेते नेहा, मनीष आणि आमीन यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी त्यांना सांगितले.
जंतर-मंतरवरील या आंदोलनाला देशभरातील अनेक मोठ्या नेत्यांचा आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांनी जंतर-मंतरवर जाऊन वांगचुक यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारने विद्यार्थी व वांगचुक यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली. याशिवाय सुप्रिया सुळे, विशाल ददलानी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, शोभा डे, राज ठाकरे आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
...तर भूत म्हणून येईन
वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्यासाठी सोमवारी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकशाहीच्या मंदिरात आपण आपले विचार मांडू, असे ते म्हणाले. ‘आपण बाहेरून कमजोर दिसत असलो तरी आतून खंबीर आहोत. २० जुलैचा मोर्चा यशस्वी न झाल्यास आपण भूत म्हणून परत येऊ’, असेही ते गमतीने म्हणाले.