नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी नागरिकत्व न घेता मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध चौकशी आणि ‘एफआयआर’ दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दिल्लीतील न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.
सोनिया गांधी यांनी ३० एप्रिल १९८३ रोजी नागरिकत्व मिळवले होते, तर १९८० च्या मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. १९८० मध्ये सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीत कसे समाविष्ट झाले, असा सवालही याचिकेत विचारण्यात आला होता. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळली.
जर सोनिया गांधी देशाच्या नागरिक होत्या तर त्यांचे नाव १९८२ मध्ये कसे वगळण्यात आले. तत्कालीन निवडणूक आयोगाने त्यावेळी दोन नावे वगळली होती. त्यापैकी एक नाव संजय गांधी यांचे होते, त्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. तर दुसरे नाव सोनिया गांधी यांचे होते, असे याचिकाकर्त्याचे वकील म्हणाले.