‘कॉकरोच’विरोधी याचिकेची तातडीने सुनावणी नाही; न्यायमूर्ती म्हणाले, भावनिक होऊ नका 
राष्ट्रीय

‘कॉकरोच’विरोधी याचिकेची तातडीने सुनावणी नाही; न्यायमूर्ती म्हणाले, भावनिक होऊ नका

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) या उपरोधिक डिजिटल संघटनेशी संबंधित उपक्रम आणि बनावट वकिलांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना, या विषयाला इतके भावनिकतेने घेऊ नका, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) या उपरोधिक डिजिटल संघटनेशी संबंधित उपक्रम आणि बनावट वकिलांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना, या विषयाला इतके भावनिकतेने घेऊ नका, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली.

सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे वकील एन. के. गोस्वामी यांना या मुद्द्याकडे 'इतके भावनिकतेने' न पाहण्यास सांगितले. सुनावणीदरम्यान वकील गोस्वामी यांनी युक्तिवाद केला की, सरन्यायाधीशांनी यापूर्वी स्पष्टीकरण दिले असतानाही, सोशल मीडियावर अद्यापही एक विकृत आणि द्वेषयुक्त नरेटिव्ह (प्रवाद) पसरवला जात आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी पुन्हा पुनरुच्चार केला की, "या गोष्टी इतक्या मनाला लावून घेऊ नका."

याच प्रकरणात दुसऱ्या एका वकिलाने बनावट कायद्याच्या पदव्यांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच न्यायालयातील अंतर्गत संभाषणाचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. यावर सरन्यायाधीश म्हणाले, यात एवढी कोणतीही मोठी आणीबाणी किंवा घाई नाही. आम्ही यावर नंतर विचार करू.

नेमकी काय मागणी

दाखल करण्यात आलेल्या याचिकेत न्यायालयाच्या कामकाजादरम्यान झालेल्या तोंडी टिपण्यांचा व्यावसायिक गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, खोट्या पदव्यांच्या आधारे वकिली करणाऱ्या बनावट वकिलांची चौकशी करण्याची मागणीही यात आहे. न्यायिक प्रक्रियेच्या अशा गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करत याचिकेत म्हटले आहे की, न्यायालयातील टिप्पण्यांचा वापर प्रसिद्धी मोहिमांसाठी केला जात आहे.

१५ मे रोजी एका वकिलाला 'वरिष्ठ वकील' दर्जा देण्याबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी "झुरळे" आणि "परजीवी" असा उल्लेख केल्याचा वाद समोर आला होता. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' नावाचा एक उपरोधिक ट्रेंड सुरू झाला.

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग; पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट; शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा