नवी दिल्ली : शिवसेना चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचा आरोप करणाऱ्या काही राजकीय नेत्यांच्या 'बेजबाबदार विधानांवर' सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि असे वर्तन स्वीकारले जाणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने नेत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पक्षकारांना अशा प्रकारच्या वर्तणुकीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
आम्ही तारखा निश्चित करू, पण त्याआधी तुमच्या लोकांना माध्यमांकडे जाण्यापासून आणि सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही, अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा, अशा शब्दांत संतप्त सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावले. तुम्ही येथे तारखा मागता आणि नंतर कोर्ट निर्णय घेत नसल्याचे बाहेर सांगता, आम्ही इशारा देत आहोत. तुमचे शब्द जपून वापरा. अशा प्रकारचे वागणे मी मान्य करणार नाही, असेही सरन्यायाधीश म्हणाले. दोन्ही बाजूंकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगतानाच, काही राजकीय नेते अशी विधाने का करत आहेत, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला.
पुढील सुनावणी ३० जुलैला
आम्ही येथे संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बसतो आणि आम्ही रिकामे बसलो आहोत असे कोणाला वाटत असेल, तर आम्हाला ते समजू शकत नाही, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले. उद्धव ठाकरे गटातर्फे हजर झालेले ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी स्पष्ट केले की, वकील कधीही अशा विधानांचे समर्थन करणार नाहीत आणि न्यायालयाच्या सोयीनुसार आम्ही युक्तिवाद करण्यास तयार आहोत. खंडपीठाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी निश्चित केली आहे.
निवडणूक आयोगाने 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि पक्षाचे नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याच विषयाशी संबंधित दोन याचिकांवर न्यायालय सुनावणी करत आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अनेक समान मुद्दे गुंतलेले असल्याने शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) वादावर युक्तिवाद ऐकले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्यानंतर, ठाकरे गटाने या निर्णयालाही बेकायदेशीर ठरवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.