नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा पहिलाच संशयित रुग्ण भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी दिली.
मंकीपॉक्स संसर्ग जास्त असलेल्या देशातून या तरुणाने प्रवास केला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. सध्या अनेक देशांमध्ये याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून याबद्दल खबरदारी घेतली जात आहे.
तसेच अशा प्रकारच्या घटनांना समोरे जाण्यासाठी देश तयार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच संभावित धोका रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी भक्कम उपाय करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून १२ आफ्रिकन देशात सुरू असलेल्या मंकीपॉक्सच्या प्रकोपामुळे याला ‘ग्लोबल इमर्जन्सी’ जाहीर केल्याच्या तीन आठवड्यांनंतर भारतात संशयित एमपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे.